रस्त्याच्या मधोमध उभ्या ट्रकवर बाईक धडकली; दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 18:38 IST2022-08-03T18:37:40+5:302022-08-03T18:38:06+5:30
दोन मित्रांच्या दुर्दवी जाण्याने गंगापूर शहरावर शोककळा

रस्त्याच्या मधोमध उभ्या ट्रकवर बाईक धडकली; दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू
गंगापूर ( औरंगाबाद ) : शहरातून औरंगाबाद येथे खाजगी शिकवणीसाठी दुचाकीवर जाणाऱ्या दोघांचा रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या ट्रकला धडकून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भेंडाळा फाटा येथे घडली यश नयन शेंगुळे (१८) रा.तळपिंपरी ता.गंगापूर ( हल्ली मुक्काम गंगापूर ) व आदिराज रामनाथ सुंब (१८) रा. मांजरी ( ह.मु. गंगापूर ) असे मृत तरुणांची नाव आहे.
यश व आदिराज दोघेही यावर्षी सोबतच बारावी उत्तीर्ण झाले होते. त्यांनी नुकतीच 'नीट'ची परीक्षा दिली होती. तर 'जेईई'साठी औरंगाबाद येथे त्यांनी खाजगी शिकवणी वर्ग लावला होता. सदरील परीक्षेच्या तयारीसाठी दोघां मित्रांनी औरंगाबाद शहरात रूम देखील घेतली होती. दरम्यान, आज पहाटे साडेसहा वाजता दोघे आदिराजच्या दुचाकीवरून ( एम.एच.२० ई.एक्स.६०४८) औरंगाबाद शहराकडे निघाले होते. सोबत गोणीमध्ये रूमवर घेऊन जाण्याचे सामान देखील होते.
औरंगाबाद-नगर मार्गांवर भेंडाळा फाटा ( गंगापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर ) येथे मुंबईहून हैद्राबादकडे सेंट्रिगचे सामान घेऊन जाणारा ट्रक ( के.ए.५६ ४१२३) रस्त्याच्या मधोमध उभा करून चालक मोहम्मद नासीर प्रात:विधीसाठी थांबला होता. यादरम्यान सकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास गंगापूरकडून दुचाकीवर येणारे आदिराज व यश रस्त्याच्या मधोमध उभ्या ट्रकला मागून धडकले. यात दोघेही गंभीर जखमी झाले. यावेळी रस्त्याने जाणाऱ्या इतर नागरिकांनी घटनेची माहिती गंगापूर पोलिसांना दिली. पो.उ.नि दीपक औटी यांनी रुग्णवाहिकेसोबत चालक सचिन सुराशे व सागर शेजवळ यांना घेऊन अपघातस्थळ गाठले. मात्र तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता.