घरगुती गॅसचे ९० सिलिंडर जप्त

By Admin | Updated: June 17, 2014 01:10 IST2014-06-17T00:53:42+5:302014-06-17T01:10:11+5:30

अजिंठा : सिल्लोडहून अजिंठा गावात घरगुती गॅसचे सिलिंडर घेऊन येणारी दोन पिकअप वाहने अजिंठा पोलिसांनी मुखपाठ फाट्यावर पकडली.

90 cylinders of domestic gas seized | घरगुती गॅसचे ९० सिलिंडर जप्त

घरगुती गॅसचे ९० सिलिंडर जप्त

अजिंठा : सिल्लोडहून अजिंठा गावात घरगुती गॅसचे सिलिंडर घेऊन येणारी दोन पिकअप वाहने अजिंठा पोलिसांनी मुखपाठ फाट्यावर पकडली. त्यामुळे ग्राहकांना गॅस सिलिंडर न मिळाल्याने मनस्ताप झाला.
अजिंठा येथे गॅस एजन्सी नाही. अजिंठा २५,००० लोकसंख्येचे गाव आहे. या गावात २००० ग्राहकांकडे गॅस कनेक्शन आहे. सिल्लोड येथील मारोती गॅस एजन्सीतर्फे अजिंठा येथे गॅस पुरवठा होतो; मात्र गेल्या वर्षापासून मारोती एजन्सीतर्फे अजिंठ्यात गॅस पुरवठा घरपोच मिळत नाही.
ग्राहक कार्ड बुक करून आणतात गॅस
यामुळे ग्राहक दर शनिवारी आॅनलाईन गॅस बुक करून रविवारी सिल्लोड येथून गॅस आणतात. आठवड्यातून केवळ एकदाच रविवारी गॅस मिळतो.
९० ग्राहकांनी केले वाहन
गॅसधारकांना सिल्लोडहून गॅस आणणे परवडत नसल्याने ९० ग्राहकांनी मिळून दोन पिकअप व्हॅन (एमएच-१२ ईएफ- ४८८७, एमएच-२० सीटी-८४१७) भाड्याने घेतल्या व गॅस घेऊन वाहन अजिंठ्याकडे येत होते. ही वाहने पोलिसांनी पकडली.
गॅस परत पाहिजे
पकडलेली दोन्ही वाहने पोलिसांनी जप्त केल्याने ग्राहकांना आज गॅस मिळाला नाही म्हणून चुलीवर स्वयंपाक करावा लागला. गॅस सिलिंडर परत मिळावेत, अशी मागणी सर्व ग्राहकांनी केली आहे.
ते गॅस ग्राहकांचेच आहेत
या प्रकरणी मारोती गॅस एजन्सीचे मालक दिग्विजयसिंग जाधव यांनी सांगितले की, ते सर्व ९० गॅस सिलिंडर ग्राहकांचेच आहेत. त्यांनी शनिवारी बुकिंग केली होती.
ग्राहकांनाच ते गॅस दिले होते. वाहनचालकाकडे त्या ग्राहकांचे गॅस कार्ड आहेत. सर्व काही कायदेशीर
आहे. (वार्ताहर)
चौकशीअंती निर्णय घेणार
या प्रकरणी अजिंठा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांनी सांगितले की, वाहने पकडली आहेत. चौकशी सुरू आहे. सिल्लोड येथील पुरवठा अधिकाऱ्यांना आम्ही पत्र दिले आहे. त्यांचा अहवाल आल्यावर व चौकशी झाल्यावर गॅस सिलिंडर सोडायचे की गुन्हा दाखल करायचा, याचा निर्णय घेऊ. सध्या स्टेशन डायरीवर नोंद घेण्यात आली आहे.

Web Title: 90 cylinders of domestic gas seized