शहरात सुरू होणार २४ तास हेल्पलाईन
By Admin | Updated: October 7, 2014 00:43 IST2014-10-07T00:35:37+5:302014-10-07T00:43:45+5:30
औरंगाबाद : नागरिकांच्या दैनंदिन अडचणी मार्गी लावण्यासंदर्भात २४ तास हेल्पलाईन सुरू करण्याचा संकल्प औरंगाबाद पूर्व मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र दर्डा यांनी केला आहे.

शहरात सुरू होणार २४ तास हेल्पलाईन
औरंगाबाद : नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडविण्यासंदर्भात, त्या मार्गी लावण्यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा करण्यासाठी २४ तास हेल्पलाईन सुरू करण्याचा संकल्प औरंगाबाद पूर्व मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र दर्डा यांनी केला आहे.
शहराच्या विकासाचा ध्यास घेतलेले राजेंद्र दर्डा यांना आधुनिकतेचाही ध्यास आहे. ‘व्हिजन औरंगाबाद’ या आपल्या जाहीरनाम्यामध्ये राजेंद्र दर्डा यांनी २४ तास हेल्पलाईन सुरू करण्याचा संकल्प केला आहे. ही हेल्पलाईन नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्याच्या कामी मदत करेल. नागरिकांना सुविधा पुरविणे, त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे व त्यासाठी सहकार्य करण्याबाबत ही हेल्पलाईन तत्पर असेल. आपल्या वॉर्डात, गल्लीत पाणी आले नाही तर हेल्पलाईनला कळविल्यास त्याचा तातडीने पाठपुरावा केला जाईल. सध्या अनेक ठिकाणी दिवसाच दिवे लागल्याचे दिसतात. हा एकप्रकारे जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे. यामुळे आपल्या मोहल्ल्यात, रस्त्यावर दिवसा विजेचे दिवे लागल्याचे दिसताच नागरिकांनी तातडीने हेल्पलाईनला कळविल्यास किंवा नागरिकांची तक्रार आल्यास हे दिवे बंद करण्यासंबंधी पाठपुरावा करण्यात येणार आहे.
शहरात विविध प्रकारची कामे होत असतात. यामध्ये कामाच्या दर्जाबाबत किंवा काम अपूर्ण असल्याबद्दल नागरिकांच्या तक्रारी असतात. कंत्राटदाराने या कामामध्ये गडबड केलेली असते. याबाबत २४ तास हेल्पलाईनला कळविल्यास हे काम चांगल्या पद्धतीने होण्यासाठी किंवा पूर्ण होण्यासाठी संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा केला जाण्याचे ‘व्हिजन औरंगाबाद’मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
सरकारी कामात नागरिकांना काही अडचण असल्यास तिथे २४ तास हेल्पलाईन प्रयत्न करेल. बऱ्याचवेळा सरकारी यंत्रणा ही नागरिकांना त्यांच्या सार्वजनिक समस्यांबाबत दाद देत नाही. अशावेळी हेल्पलाईन मदतीला येईल. नागरिकांच्या जीवनात अनेक लहानसहान गोष्टींमुळेही खोळंबा होतो.
छोट्याशा अडचणीमुळे कधीकधी मोठे काम अडून बसते. त्यामुळे लहानसहान; परंतु त्रासदायक अडचणी सोडविण्यासंदर्भात ही हेल्पलाईन २४ तास पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
नागरिकांच्या समस्या सोडविण्यासंदर्भात २४ तास हेल्पलाईन बरोबरच, मोबाईल अॅप आणि फेसबुकचे अकाऊंटही सुरू करण्यात येणार असल्याचे ‘व्हिजन औरंगाबाद’मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
जनतेचीच मागणी -राजेंद्र दर्डा
टीम औरंगाबादने शहरातील सुमारे ५२ हजार घरांपर्यंत जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या आशा- आकांक्षा लक्षात घेतल्या. अनेक नागरिकांनी दैनंदिन जीवनात त्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्याबाबत मागण्या केल्या. यातूनच नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडविण्यासंदर्भात २४ तास हेल्पलाईन सुरू करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. शहरासाठी ही एक नवी संकल्पना असून याद्वारे जनतेच्या समस्या सोडविण्यासंदर्भात पाठपुरावा करण्यात येणार आहे, असे राजेंद्र दर्डा यांनी सांगितले.