अवकाळीचा १८४ गावांना फटका

By Admin | Updated: April 14, 2015 00:31 IST2015-04-14T00:31:50+5:302015-04-14T00:31:50+5:30

बीड : अवकाळी पाऊस शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. ९ ते १२ एप्रिल या कालावधीत झालेला अवेळी पाऊस व गारपीट यांच्यामुळे जिल्ह्यातील

184 incidents of undeveloped villages | अवकाळीचा १८४ गावांना फटका

अवकाळीचा १८४ गावांना फटका


बीड : अवकाळी पाऊस शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. ९ ते १२ एप्रिल या कालावधीत झालेला अवेळी पाऊस व गारपीट यांच्यामुळे जिल्ह्यातील १८४ गावांतील १ हजार ७६५ हेक्टरवरील फळबागा, शेतीपिके व भाजीपाला यांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
बीड तालुक्यातील ६ गावे, आष्टी - ६, गेवराई - १७, धारूर - २२, वडवणी - १२, अंबाजोगाई - १६, केज - ८३ व परळी - २२ या गावांमध्ये अवकाळी गारपीट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. गेल्या महिन्याच्या सुरूवातीला गारपीट झाली होती. तेव्हा जवळपास ६० कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. आता एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाही अवकाळी पाऊस झाल्यामुळे १ हजार ७६५ हेक्टरवरील फळपिके, शेतीपिके व भाजीपाला बाधित झाल्याचा अंदाज व्यक्त झाला आहे.
विशेष म्हणजे बाधित क्षेत्रामध्ये फळबागांचे नुकसान अधिक झाले असल्याचे समोर आले आहे. १ हजार १६९ हेक्टर फळबागांचे नुकसान झाले आहे. त्यात परळी व केज तालुक्यातील गावांमधील फळबागांचा समावेश आहे. शेतीपिकांचे अत्यल्प नुकसान झाले आहे तर भाजीपाल्याला मोठा फटका बसला आहे. ५७६ हेक्टरवरील भाजीपाला बाधित झाला आहे. केज व धारूर तालुक्यातील क्षेत्र अधिक आहे. केजमधील १९३ तर धारूर १८५ हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. एकूण बाधित क्षेत्रापैकी ५० टक्क्यापेक्षा कमी असणारे क्षेत्र ५६ च्या आत तर ५० पेक्षा जास्त बाधित क्षेत्र १ हजार ७०९ हेक्टर असल्याचा अंदाज व्यक्त झाला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 184 incidents of undeveloped villages