श्रमदानातून चेहरा बदललेल्या कोटगावला सीओंची भेट

By Admin | Updated: April 25, 2015 01:32 IST2015-04-25T01:32:36+5:302015-04-25T01:32:36+5:30

नागभीड तालुक्यातील कोटगाव येथील गावकऱ्यांनी श्रमदानाच्या माध्यमातून गावाचा चेहरामोहरा बदलवून टाकला व प्रशासनाचे लक्ष वेधले.

Visit to Cotagawa Seo from Labor | श्रमदानातून चेहरा बदललेल्या कोटगावला सीओंची भेट

श्रमदानातून चेहरा बदललेल्या कोटगावला सीओंची भेट

चंद्रपूर: नागभीड तालुक्यातील कोटगाव येथील गावकऱ्यांनी श्रमदानाच्या माध्यमातून गावाचा चेहरामोहरा बदलवून टाकला व प्रशासनाचे लक्ष वेधले. जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलील यांनी कोटगावला प्रत्यक्ष भेट देऊन गावकऱ्यांची प्रशंसा केली.
तहसीलदार श्रीराम मुंधडा, संवर्ग विकास अधिकारी बीरमवार, कृषी अधिकारी पठाण, माजी जि.प. उपाध्यक्ष अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, माजी जि.प. सदस्य विलास दोनोड, सभापती रेखा जगनाडे, सरपंच अरुण काटेखाये व तालुक्यातील प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते. त्या सर्वांनी गावाची पहाणी करुन एकूण स्थितीचा आढावा घेतला आणि समाधान व्यक्त केले.
स्व. केशवराव भेंडारकरांनी १५ वर्षांपर्यंत कोटगावचे सरपंचपद सांभाळले आणि १९५६ ला आदर्श गाव म्हणून तत्कालीन शासनाने या गावाला गौरविले होते. नव्हे, विशेष बक्षिस देऊन गावात विविध सोयी- सुविधा प्राप्त करुन दिल्या होत्या. १२ जानेवारीला संपूर्ण गावकऱ्यांनी खराटा हाती घेऊन गाव स्वच्छ केले. गावातील नाल्या उपसून त्यामधून ५० ट्रॅक्टर अस्वच्छ माती बाहेर काढून योग्य विल्हेवाट लावली. गावातील मुख्य रस्यावर मुरुम पसरवून रस्ते निटनेटके व योग्य केले. गावातील अतिक्रमणे हटविली, घनकचऱ्यांचे योग्य व्यवस्थापन केले. शौचालयाचा वापर करण्याचा निर्धार करण्यात आला.
गाव व्यसनमुक्त करण्याचा सर्वांनी निर्धार केला. सेंद्रीय खतांचा वापर करुन शेती पिकविण्याचे निश्चित करण्यात आले. हे सर्व कार्यान्वित होण्याच्या दृष्टीने गावात मोहल्ला समित्याची स्थापना करण्यात आली. त्यामुळे गावात आज सर्वत्र शांतता व स्वच्छता दृष्टीस पडते. गावाचा चेहरा -मोहरा बदलल्याचे दिसून येते.
जि.प. चे मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलील यांनी कोटगावला भेट देऊन गावाची पाहणी केली आणि गावाला विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचे निश्चित केले. यावरुन ‘गाव करी ते राव न करी’ याचा प्रत्यय कोटगावच्या उदाहरणावरुन होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Visit to Cotagawa Seo from Labor