लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती (चंद्रपूर): महाराष्ट्र-तेलंगणा सीमावाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, जिवती तालुक्यातील १५ वादग्रस्त सीमावर्ती गावांत दोन्ही राज्यांकडून एकाचवेळी जनगणना प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सीमाभागात तणाव आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकाच व्यक्तीची नोंद दोन्ही राज्यांच्या जनगणना यादीत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
केंद्र शासनाच्या जनगणना मोहिमेला जिवती तालुक्यात सुरुवात झाली असून, तहसीलदार रूपाली मोगरकर यांनी नागरिकांना यापूर्वी ऑनलाइन 'स्वगणना' करण्याचे आवाहन केले होते. १६ मे ते १४ जूनदरम्यान घरगणना प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मात्र, त्याचवेळी तेलंगणा प्रशासनानेही सीमावर्ती गावांत जनगणना सुरू केल्याने परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनली आहे. कुमुरमभीम आसिफाबाद जिल्हांतर्गत केरामेरी मंडळातील मुकदमगुडा येथे तेलंगणा प्रशासनाच्या घर नकाशांकन सर्वेक्षणाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला. "आम्ही महाराष्ट्रातच राहणार," अशी ठाम भूमिका घेत नागरिकांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. गावातील सर्व नागरिक मराठी भाषिक असून, मुलांचे शिक्षण महाराष्ट्रातच होत असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले. तसेच शेतजमिनींचे पट्टे मिळाले नसल्याचाही आरोप नागरिकांनी केला. तणाव वाढताच पर्यवेक्षक पदकम टी. अजय कुमार यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून विविध शासकीय सुविधा सुरू राहतील, असे आश्वासन दिल्यानंतर सर्वेक्षण पुन्हा सुरू करण्यात आले.
या गावात तेलंगणा सरकारकडून जनगणना प्रक्रिया सुरू
परमडोली, मुकदमगुडा, कोठा (बुज), महाराजगुडा, अंतापूर, येसापूर, लॅडिगुडा, पळसगुडा ही आठ महसुली गावे तसेच परमडोली तांडा, लेंडीजाळा, शंकरलोधी, पद्मावती, इंदिरानगर, भोलापठार, कोठा (खुर्द) हे सात गुडे-पाडे अशा एकूण १५ सीमावर्ती गावांत सथ्या तेलंगणा सरकारकडून जनगणना प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, केरामेरी मंडळचे तहसीलदार घोडाम संतोष कुमार यांनीही पथकासह गावाला भेट देत नागरिकांना तेलंगणा सरकारच्या सर्वेक्षणाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. मात्र, ग्रामस्थांनी पुन्हा आपली महाराष्ट्रात राहण्याची भूमिका स्पष्ट केल्याची माहिती समोर आली आहे.
यापूर्वीही समांतर जनगणना
- यापूर्वी २०१०-११ च्या जनगणनेवेळीही दोन्ही राज्यांकडून समांतर जनगणना करण्यात आली होती. आता पुन्हा तोच प्रकार घडत असल्याने सीमाभागातील नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
- सीमावादाचा कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
- तेलंगणा सरकारकडून सुरू असलेली जनगणना तत्काळ थांबवून महाराष्ट्र सरकारकडूनच या गावांत जनगणना करण्यात यावी, अशी मागणी तहसीलदारामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून सामाजिक कार्यकर्ते रामदास रणवीर, लिंबादास पतंगे, छगन साळवे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
Web Summary : Maharashtra-Telangana border dispute escalates as both states conduct census simultaneously in disputed villages. Villagers in Chandrapur district protest Telangana's survey, firmly stating their desire to remain in Maharashtra, citing Marathi language and education.
Web Summary : महाराष्ट्र-तेलंगाना सीमा विवाद फिर से बढ़ गया है क्योंकि दोनों राज्य विवादित गांवों में एक साथ जनगणना कर रहे हैं। चंद्रपुर जिले के ग्रामीणों ने तेलंगाना के सर्वेक्षण का विरोध करते हुए महाराष्ट्र में रहने की इच्छा व्यक्त की है।