केंद्रीय पद्धतीने शाळा प्रवेशासाठी साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 05:00 AM2020-06-03T05:00:00+5:302020-06-03T05:01:01+5:30

कोरोनाचे संकट देशावर आले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. याचा परिणाम शिक्षण विभागावरही पडला. यावर्षी प्रथमच पहिली ते नववीपर्यंत परीक्षा न होताच निकाल लागले. एवढेच नाही तर, शाळांना मार्च महिन्यामध्येच सुट्या लागल्या. सध्या शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. यामध्ये जिल्ह्यातील काही शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी प्रवेश घेत आहेत, तर काही शाळांमध्ये विद्यार्थीच मिळत नसल्याचे चित्र आहे.

Sakade for central school admission | केंद्रीय पद्धतीने शाळा प्रवेशासाठी साकडे

केंद्रीय पद्धतीने शाळा प्रवेशासाठी साकडे

googlenewsNext
ठळक मुद्देमुख्याध्यापकांना चिंता : शाळांत मर्यादेपेक्षा अतिरिक्त विद्यार्थ्यांना दिला जात आहे प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सध्या शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. यामध्ये काही शाळा अतिरिक्त विद्यार्थ्यांना प्रवेश देत असल्याने भविष्यात सोशल डिस्टन्सिंगअभावी धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यावर्षी केंद्रीय पद्धतीने शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबवावी, जेनेकरून विद्यार्थी संख्या मर्यादित राहिल तसेच अन्य शाळांनाही विद्यार्थी मिळेल, अशी मागणी जिल्ह्यातील काही मुख्याध्यापकांनी केली आहे. यासंदर्भात शिक्षणाधिकारी तसेच शिक्षक संघटनांनाही निवेदन देण्यात आले आहे.
कोरोनाचे संकट देशावर आले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. याचा परिणाम शिक्षण विभागावरही पडला. यावर्षी प्रथमच पहिली ते नववीपर्यंत परीक्षा न होताच निकाल लागले. एवढेच नाही तर, शाळांना मार्च महिन्यामध्येच सुट्या लागल्या. सध्या शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. यामध्ये जिल्ह्यातील काही शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी प्रवेश घेत आहेत, तर काही शाळांमध्ये विद्यार्थीच मिळत नसल्याचे चित्र आहे. ज्या शाळांमध्ये अतिरित्त विद्यार्थी आहे त्या शाळांमध्ये कोरोनाच्या दहशतीत सोशल डिस्टन्सिंग पाळणे कठीण जाणार आहे. तर ज्या शाळांना विद्यार्थीच मिळाले नाही, त्या शाळांतील शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे केंद्रीय पद्धतीने शाळांत प्रवेश प्रक्रिया राबविण्याची मागणी सध्या जोर धरत आहे.

शाळांसाठी सोशल डिस्टन्सिंगची डोकेदुखी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पुरेशी मोकळी जागा असणे गरजेचे आहे. मात्र चंद्रपूरसह जिल्ह्यातील काही शाळांमध्ये मोकळे मैदानच नसल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे काय, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी
सध्या विविध शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये वाट्टेल तेवढ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. इयत्ता पहिली,पाचवी तसेच इतर वर्गांसाठी प्रवेश देताना विद्यार्थी संख्या मर्यादित ठेवणे गरजेचे आहे. यासाठी शिक्षण विभागाने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

काही शाळांना विद्यार्थीच नाही
जिल्ह्यातील काही शाळा विद्यार्थ्यांना विविध आमिष दाखवित आहे. त्यामुळे या शाळांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. तर दुसरीकडे काही शाळांना विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे शाळा कशा चालवायच्या, असा प्रश्न सध्या संस्थाप्रमुख तसेच शिक्षकांना पडला आहे.
एका बेंचवर एकच विद्यार्थी बसण्याची व्यवस्था करावी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी बसण्याची व्यवस्था वेगळी करणे आवश्यक आहे. जर प्रत्येक बाकावर एक प्रमाणे विद्यार्थी बसविले तर कोरोनाचे संकट काही प्रमाणात टाळता येणे शक्य आहे.

केंद्रीय पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास सोशल डिस्टन्सिंग पाळून भविष्यातील धोके टाळता येईल. त्यामुळे शिक्षण विभागाने यावर विचार करून प्रत्येक शाळांतील तसेच वर्गातील विद्यार्थी मर्यादा ठरवून देणे गरजेचे आहे.
- हरिहर भांडवलकर
प्राचार्य, न्यू इंग्लिश हायस्कूल, चंद्रपूर

काही मुख्याध्यापकांनी आपल्याकडे यासंदर्भात निवेदन दिले आहे. मात्र शासनस्तरावर अजूनपर्यंत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.
-संजय डोर्लीकर
शिक्षणाधिकारी, माध्यमिक

Web Title: Sakade for central school admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.