सरपंचपदाच्या लॉटरीत तीन अपत्यांचा अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:35 IST2021-02-05T07:35:13+5:302021-02-05T07:35:13+5:30

गोंडपिपरी : नशीब बलवत्तर तर सर्व काही मनासारखे असे प्राचीन काळापासून पूर्वजांचे म्हणणे आहे. अगदी यालाच साजेसा असा ...

Obstacles of three children in Sarpanchpada lottery | सरपंचपदाच्या लॉटरीत तीन अपत्यांचा अडसर

सरपंचपदाच्या लॉटरीत तीन अपत्यांचा अडसर

गोंडपिपरी : नशीब बलवत्तर तर सर्व काही मनासारखे असे प्राचीन काळापासून पूर्वजांचे म्हणणे आहे. अगदी यालाच साजेसा असा अचंबित प्रकार गोंडपिपरी तालुक्यातील गिरगाव ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर सरपंचपदाच्या आरक्षणादरम्यान घडला. ईश्वर चिठ्ठीने निवडून आलेल्या उमेदवाराला थेट सरपंचपदावर विराजमान होण्याची संधी मिळाल्याने चक्क त्या उमेदवाराचे नशीबच उघडले. मात्र, आता तीन अपत्यांचा अडसर आला आहे.

तालुक्यातील गिरगाव ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत अनु.जमाती महिलांकरिता राखीव असलेल्या प्रभाग क्रमांक ३ मधून आशा मडावी या उमेदवार ईश्वर चिठ्ठीने विजयी झाल्या. नशिबाने त्यांची इथेच साथ सोडली नाही, तर सरपंचपदाच्या आरक्षणादरम्यान अनुसूचित जमाती महिला राखीव असे विरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण आल्याने व अनुसूचित जमातीच्या त्या एकमेव महिला उमेदवार असल्याने, थेट सरपंचपदाची लॉटरी त्यांना लागली. मात्र, आता या प्रकरणात नवाच ट्विस्ट आला आहे. आशा मडावी यांना तीन अपत्ये आहेत. त्यांना तीन अपत्ये असल्याच्या कारणावरून विरोधकांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार करीत असल्याचा मानस व्यक्त केला असून, आता आशा मडावी यांचे नशीब कितपत साथ देते, याकडे संपूर्ण तालुकावासीयांचे लक्ष वेधले आहे.

Web Title: Obstacles of three children in Sarpanchpada lottery