धाडसी चोरीत सव्वा लाखाचा मुद्देमाल लंपास

By Admin | Updated: December 12, 2015 03:21 IST2015-12-12T03:21:42+5:302015-12-12T03:21:42+5:30

येथील अभियंता कॉलनी परिसरात गुरूवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक

Lampas in the bold stages | धाडसी चोरीत सव्वा लाखाचा मुद्देमाल लंपास

धाडसी चोरीत सव्वा लाखाचा मुद्देमाल लंपास

चंद्रपूर: येथील अभियंता कॉलनी परिसरात गुरूवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चोरी व दरोड्याच्या घटनांनी शहरातील नागरिक हादरून गेले असताना गुरूवारी मध्यरात्रीनंतर घडलेल्या या घटनेने नागरिकांच्या दहशतीत भर घातली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांचे ज्येष्ठ बंधू तथा सेवानिवृत्त कृषी अधिकारी शशिकांत वैद्य हे त्यांच्या कुटुंबासह नागपूर येथे गेले असता गुरूवारी रात्री चोरट्यांनी डाव साधला. शशिकांत वैद्य हे स्थानिक अभियंता कॉलनीतील सेदानी यांच्याकडे किरायाने राहतात. अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश मिळविला व घरातील कपाटात ठेऊन असलेल्या चार तोळे वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या व रोख रक्कम असा एकूण सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. शुक्रवारी सकाळी ही घटना उजेडात आल्यानंतर या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार करण्यात आली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. रात्रीच्या गस्तीसाठी पोलिसांकडून टाळाटाळ केली जात असल्याचाही नागरिकांचा सूर आहे. पोलिसांनी शहरातील विविध भागात गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Lampas in the bold stages