Invasion of reserved seats in ST | एसटीतील राखीव जागांवर अतिक्रमण
एसटीतील राखीव जागांवर अतिक्रमण

ठळक मुद्देवाहकाने लक्ष द्यावे : वयोवृद्ध तथा अपंग प्रवाशांना नाहक त्रास

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये अपंगांसह, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव असणाऱ्या जागांवर धडधाकट प्रवासीच अतिक्रमण करीत असल्याचे दिसून येते. वाहकाकडून याबाबत कुठलेही सहकार्य मिळत नसल्याने महामंडळाच्या सेवाभावी योजनांचा फज्जा उडाला आहे.
अपंग प्रवाशांना एसटीत चढता उतरताना चालक-वाहकांनी मदत करणे आवश्यक आहे. तशी प्रत्येक बसच्या दरवाज्यावर सूचनादेखील लिहिलेली असते. मात्र त्याचे तंतोतंत पालन केले जात नाही.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने गाव तिथे एसटीही सुविधा सुरु करुन प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र बसच्या आसनांवर अनेकांसाठी राखीव आसन असल्याचे नमुद असते. मात्र या राखीव आसनांवर अन्य प्रवासी बसून प्रवास करतात.
त्यामुळे ज्यांच्याकरिता हे आसन राखीव आहे, अशांना त्याचा लाभ मिळत नाही. अशा प्रवाशांना उभे राहावे लागते. यात वयोवृद्धांना मोठा फटका बसतो. सोबतच खासदार किंवा आमदार हे लोकप्रतिनिधी बसने कधीही प्रवास करताना दिसत नाही. मात्र त्यांच्याकरिता आसने आरक्षित असते.

सौजन्य अभिवादन योजनेचा बोजवारा
प्रवाशी वाढविण्यासाठी राष्ट्रीय परिवहन महामंडळाने सौजन्य अभिवादन योजना सुरु केली होती. या योजनेतंर्गत चालक व वाहकाला प्रवासी बसल्यानंतर सर्वांना नमस्कार करुन आपला परिचय द्यायचा होता. तसेच अपंग प्रवासी असल्यास त्याला बसमध्ये चढण्यास मदत करायचे होती. मात्र चालक वाहक याविरुद्धची वागणूक प्रवाशाला देत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Invasion of reserved seats in ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.