Inspection of experimental agriculture by Pune Deputy Director of Agriculture | प्रयोगशील शेतीची पुणे कृषी उपसंचालक यांच्याकडून पाहणी

प्रयोगशील शेतीची पुणे कृषी उपसंचालक यांच्याकडून पाहणी

चंद्रपूर : जिल्ह्यातील घुग्गुस व भ्रदावती येथे आफ्रिकन टॉल वाणाचे मका चारा पीक, हळद शेती, हरभरा व भाजीपाल्याच्या प्रयोगशील शेतीला पुणे कृषी आयुक्तालयाचे कृषी उपसंचालक माणिक त्र्यंबके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील, कृषी उपसंचालक तथा प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांनी भेट देऊन पाहणी केली.

घुग्गुस येथील प्रदीप नत्थुजी जोगी यांच्या शेतावर आत्माअंतर्गत जिल्हा खनिज प्रतिष्ठानद्वारे अनुदानित आफ्रिकन टॉल वाणाचे मका चारा पीक प्रात्यक्षिकाची पाहणी करण्यात आली. तसेच आत्माअंतर्गत चांदा ते बांदा योजनेद्वारे अनुदानित सोलर लाइट ट्रॅप, भाजीपाला लागवड, दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन तसेच स्मार्ट प्रकल्पांतर्गत प्रस्तावित जावा सित्रोनेला सुगंधी औषधी तेल उत्पादन नियोजित प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात आले.

नंदोरी (बु.) येथे गटशेती योजनेंतर्गत लाभार्थी गट भूमिपुत्र शेतकरी बचत गट नंदोरी हळद प्रक्रिया प्रकल्पाला भेट दिली असता, गटाचे अध्यक्ष नरेंद्र जीवतोडे यांनी प्रकल्पातील राबविण्यात आलेल्या घटकाबाबत माहिती दिली. फलोत्पादन शेतकरी सुधाकर जीवतोडे यांनी भाऊसाहेब फुंडकर योजनेंतर्गत लागवड केलेल्या फळबागा व बाजारपेठेबाबत कृषी उपसंचालक, त्र्यंबकेसाहेब यांच्याशी चर्चा केली.

प्रयोगशील शेतकरी सुनील उमरे यांनी उसामध्ये हरभरा व जवस पीक तसेच बीबीएफ यंत्राद्वारे हरभरा पिकाची पेरणी करण्यात आली. त्याबाबत माहिती दिली. मधमाशीपालन शेतकरी दत्तू येरगुडे, पिरली यांनी मधमाशीपालन व्यवसायाबाबत त्यांचे अनुभव व्यक्त केले. मध (सहद) बाजारपेठ व विक्री व्यवसायाबाबत चर्चा करण्यात आली. सदर प्रक्षेत्र भेट कार्यक्रमाला यावेळी कृषी विकास अधिकारी शंकर किरवे, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे, मंडळ कृषी अधिकारी भास्कर गायकवाड, खिल्लारी, अमर वाळके, उपविभागीय कृषी अधिकारी, आर.टी. जाधव, पंचायत समिती सभापती प्रवीण ठेंगणे, पी.जी. कोमटी, सुतार, पी.एम. ठेंगणे, एस.सी. हिवसे, जे.बी. नेहारे, ए.जी. वाकळे, वाय.एन. शिंदे, मिसाळ, जी.यू. कवारखे आणि शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Inspection of experimental agriculture by Pune Deputy Director of Agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.