लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात मंगळवारी दुपारी अचानक आलेल्या वादळी पावसाने मोठा तडाखा बसला. या वादळामुळे विविध भागांत नुकसान झाले. मूल तालुक्यातील राजोली येथे शेतशिवारातील वीटभट्टीवरील शेड कोसळून प्रशांत डोनू शेणमारे (४२) रा. राजोली यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेत दोन मजूर जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, शेणमारे यांनी नुकतीच वीटभट्टी सुरू केली होती आणि तिची पाहणी करत असतानाच ही दुर्घटना घडली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसासह काही ठिकाणी गारपीट झाली. वादळी वाऱ्यामुळे अनेक वीजखांब कोसळले असून वीजपुरवठा खंडित झाला. दरम्यान, डोंगरवार-राजोली मार्गावर झाड कोसळून एका कारचे नुकसान झाले. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली; मात्र काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती.
गोंदियात पाऊस आणि गाराही
रखरखत्या उन्हाने एकीकडे गोंदिया जिल्हावासीयांना चांगले भाजून काढले असतानाच मंगळवारी सायंकाळी अचानकच वादळी वाऱ्यासह बरसलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. जिल्ह्यातील बहुतांश भागात हा पाऊस बरसला असून, पावसामुळे घर व दुकानांचे छत उडाल्याचे प्रकार घडले. तर पावसामुळे पिकांचेही नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पावसासोबतच गारपीटही झाली आहे.
प्रचंड उकाड्याने त्रस्त झालेल्या विदर्भाच्या बहुतेक जिल्ह्यातील नागरिकांना मंगळवारी काहीसा दिलासा मिळाला. तापमान १ ते २.५ अंशापर्यंत घसरल्याने उष्णतेचा त्रास कमी झाला. हवामान विभागाने ३ ते ५ मे दरम्यान विदर्भातील सर्व जिल्ह्यांत वादळासह पावसाचा अंदाज वर्तवला होता. मात्र दोन दिवस ढगांची उपस्थिती राहूनही उन्हाचे चटके व उकाड्याने छळले आहे. अखेर मंगळवारी सूर्याचा ताप घटला. नागपूरला सकाळपासून ऊन पडले होते, पण दुपारनंतर वातावरण बदलले व आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली होती. काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. मात्र उन्हाची तीव्रता बऱ्यापैकी कमी झाली. कमाल तापमान २.४ अंशाने खाली घसरत ४०.८ अंशाची नोंद झाली. अनेक दिवसांनंतर तापमान सरासरीपेक्षा १.९ अंशाने खाली आल्याने उष्णतेचा त्रास कमी झाला. सायंकाळचे वातावरणही आल्हाददायक झाले. रात्रीचे तापमान २.४ अंशाने खाली आले. ब्रह्मपुरीला ०.६ मिमी पावसाची नोंद झाली. सोमवारी देशात सर्वाधिक उष्ण असलेल्या ब्रह्मपुरीचे तापमान २ अंशाने घसरून ४२.२ अंशावर आले. इतर जिल्ह्यातही अंशतः घट झाली आहे.
मोहाडीत धान पीक जमीनदोस्त
भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील मोहगाव परिसरासह तालुक्यात वादळी वारा व मुसळधार पावसामुळे शेतातील उभे धान पीक पूर्णपणे आडवे झाले आहे. कापणीला अवघे १० ते १५ दिवस बाकी असताना मोहगाव, बोथली, पांजरा, दहेगाव, पारडी व रोहणा या गावांतील शेकडो एकर धान पिकाला फटका बसला. शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. तसेच मलिदा येथे घरावरील टीन कोसळल्याने १९ वर्षीय तरूण जखमी झाला.
Web Summary : A storm in Chandrapur killed one and injured two as a shed collapsed. Bhandara and Gondia experienced hailstorms, damaging crops and disrupting power. Vidarbha saw temperature drops, offering relief from heat. Mohadi's paddy crops were flattened, prompting calls for compensation.
Web Summary : चंद्रपुर में तूफान से एक की मौत, दो घायल हुए क्योंकि एक शेड ढह गया। भंडारा और गोंदिया में ओलावृष्टि हुई, जिससे फसलें नष्ट हुईं और बिजली बाधित हुई। विदर्भ में तापमान गिरा, जिससे गर्मी से राहत मिली। मोहाडी में धान की फसलें बर्बाद हो गईं, मुआवजे की मांग उठी।