एका तपापासून शेतकरी मोबदल्यापासून वंचित

By Admin | Updated: April 25, 2015 01:28 IST2015-04-25T01:28:53+5:302015-04-25T01:28:53+5:30

चिमूर तहसील अंतर्गत येणाऱ्या डोगर्ला येथे सन २००२ मध्ये सिंचाई विभागाद्वारे मामा तलावाचा विस्तार करण्यात आला.

Farmers are deprived of remuneration since one check | एका तपापासून शेतकरी मोबदल्यापासून वंचित

एका तपापासून शेतकरी मोबदल्यापासून वंचित

खडसंगी : चिमूर तहसील अंतर्गत येणाऱ्या डोगर्ला येथे सन २००२ मध्ये सिंचाई विभागाद्वारे मामा तलावाचा विस्तार करण्यात आला. त्याकरिता जाभुळविहिरा साजातील डोंगर्ला गावातील ११ शेतकऱ्यांच्या शेतजमिनी पाण्याखाली आल्या. या शेतकऱ्याच्या जमिनी शासनाने हस्तांतरित करून घेतल्या. मात्र तलावात जमिनी गेलेले ११ शेतकरी एका तपापासून मोबदल्यापासून वंचित आहेत.
शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी, म्हणून शासन गावाशेजारी असलेल्या पुरातन तलावाचे विस्तारीकरण करून परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ देते. याकरिता मौजा डोगर्ला येथील मामा तलावाचे विस्तारीकरण करण्यात आले. या तलावाच्या विस्तारीकरणाचे डोंगर्ला येथील ११ शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली आल्या. त्यामुळे या शेतकऱ्यांना या जमिनीवर पीक घेता येत नसल्याने शासनाने त्यांना शासकीय दरानुसार मोबदला देण्याचा नियम आहे. प्रभावित शेतकऱ्याने रितसर सिंचन विभागाकडे मागणी केली. मात्र मागील १३ वर्षांपासून या शेतकऱ्यांचे प्रस्ताव कार्यालयातच धूळखात पडले आहेत.
बाधित शेतकरी अनेक वर्षांपासून चिमूर येथील सिंचाई विभागाचे उंबरठे झिजवीत आहे. मात्र येथील अधिकारी शेतकऱ्यांना उडवाउडवीचे उत्तर देऊन पीडित शेतकऱ्यांना आल्या पावली परत पाठवितात. त्यामुळे शेतकऱ्यांनी विदर्भवादी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संयोजक नारायण जांभुळे याच्याकडे आपबिती सांगितली असता, जांभुळे यांनी शुक्रवारी दुपारी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना घेवून लघु सिंचाई कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. या अन्यायग्रस्त शेतकऱ्याच्या ठिय्या आंदोलनाचा धसका घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यानी एक महिन्यात या शेतीचा प्रस्ताव पाठविल्याचे आश्वासन अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना दिले.

Web Title: Farmers are deprived of remuneration since one check