राजुरा तालुक्यातील दहा गावात नागरिकांनी केली गावबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 06:00 IST2020-03-26T06:00:00+5:302020-03-26T06:00:31+5:30

प्रकाश काळे। लोकमत न्यूज नेटवर्क गोवरी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलली आहेत. १४ एप्रिलपर्यंत राज्यात ...

Citizens ban ten villages in Rajura taluka | राजुरा तालुक्यातील दहा गावात नागरिकांनी केली गावबंदी

राजुरा तालुक्यातील दहा गावात नागरिकांनी केली गावबंदी

ठळक मुद्देगो कोरोना : गावात याल तर खबरदार; बाहेरील व्यक्तींना तंबी

प्रकाश काळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलली आहेत. १४ एप्रिलपर्यंत राज्यात संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर राजुरा तालुक्यातील पाच गावांमध्ये नागरिकांनी गावातील मुख्य रस्ताच सील करून गावबंदी केली आहे.
राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाटयाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या, जिल्ह्याच्या तसेच आता गावाच्या सीमा नागरिकांनी सील केल्या आहेत. राजुरा तालुक्यातील पाचगाव, भेंडवी, चंदनवाही, मंगी, पांढरपौनी, कळमना, सोनापूर, सालेगुडा, रेंगेगुडा, गोपालपूर या गावातील गावकऱ्यांनी मुख्य रस्त्या पूर्णत: बंद केल्याने बाहेरील व्यक्ती येऊ शकत नाही. चुकून बाहेरील व्यक्ती गावात आला तर त्याला दुरूनच विचारपूस करून गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील यांना विचारून योग्य चौकशी करूनच प्रवेश दिला जातो. यासाठी गावातील युवक दुरूनच बाहेरून आलेल्या व्यक्तीवर पाळत ठेऊन असतात. नागरिकांनी गावबंदी केल्यामुळे बाहेरून आलेल्या व्यक्तींची चांगलीच पंचाईत झाली आहे. मौजा पाचगाव येथे कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत पाचगावच्या वतीने तहसीलदार रवींद्र होळी यांची परवानगी घेऊन गावातील मुख्य रस्ते बंद करण्यात आले.
प्रत्येक दुकानदारांना जिल्हा व तालुका प्रशासनाने आदेश पत्र देऊन दुकानातून खर्रा, गुटखा व कोल्ड्रिंक विकू नये, जर कोणी विकताना आढळल्यास त्यांच्यावर योग्य कार्यवाही करण्यात येईल, अशी ताकीद करण्यात आले.
तसेच गावातील मुख्य चौकामध्ये कुणीही गर्दीने बसू नये, कलम १४४ नुसार संचारबंदी लागू आहे. या कायद्याचे पालन नागरिकांनी करावे, असे पत्रक ग्रामपंचायतीच्या वतीने गावात लावण्यात आले आहे.
या नियमांचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकही कोरोनासारख्या महाभयानक रोगाच्या पार्श्वभूमीवर सतर्क झाले असून राजुरा तालुक्यातील गावागावात बाहेरील व्यक्तीसाठी गावबंदी करण्यात आली आहे.

सावरगाव परिसरातील अनेक गावात प्रवेश बंदी
सावरगाव : संपूर्ण भारत देशात कोविड -१९ चा वाढता प्रकोप बघता आणि कुणालाही कोरोना विषाणूचे संक्रमण होऊ नये. यासाठी खबरदारी म्हणून नागभीड तालुक्यातील सावरगाव परिसरातील अनेक गावात प्रवेश बंदीचे आवाहन करण्यात आले. कोविड -१९ कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला मृत्यूच्या कवेत कवटाळले असताना आता भारतातही या विषाणूने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. याची पूर्व खबरदारी म्हणून भारत सरकारने संपूर्ण देशाला लॉकडाऊन करण्याची घोषणा २४ मार्चच्या रात्रीला केली. आणि तसे आदेश सोडले. दरम्यान सर्वांना घरी राहण्याबाबत सक्ती केली जात आहे. विविध माध्यमातून जागृती करण्यात येत आहे. या अनुषंगाने सावरगाव परिसरातील कन्हाळगाव (सोनुली), सावरला आदी गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
 

Web Title: Citizens ban ten villages in Rajura taluka