शंकर लोधीच्या गुफा उलगडणार चंद्रपूरचा प्राचीन इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:30 IST2020-12-06T04:30:49+5:302020-12-06T04:30:49+5:30

चंद्रपूर : गोंड राजांची राजधानी म्हणून चंद्रपूरची देशभरात ओळख असली तरी प्राचीन इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा जिल्ह्यात आहेत. नैसर्गिक वारसा ...

The ancient history of Chandrapur will unfold in the cave of Shankar Lodhi | शंकर लोधीच्या गुफा उलगडणार चंद्रपूरचा प्राचीन इतिहास

शंकर लोधीच्या गुफा उलगडणार चंद्रपूरचा प्राचीन इतिहास

चंद्रपूर : गोंड राजांची राजधानी म्हणून चंद्रपूरची देशभरात ओळख असली तरी प्राचीन इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा जिल्ह्यात आहेत. नैसर्गिक वारसा लाभलेले जिवती तालुक्यातील शंकर लोधी येथील दुर्लक्षित गुफा पर्यटन व ऐतिहासिक दृष्टीने महत्त्व राखून आहेत. पुरातत्त्वचे अभ्यासक व तज्ज्ञांनी यावर संशोधन केल्यास चंद्रपूरचा प्राचीन इतिहास पुढे येऊ शकतो; परंतु याकडे अजून कुणाचेही लक्ष गेले नाही.

अतिदुर्गम माणिकगड पहाडावर वसलेलेल्या ८०-९० गावे समाविष्ट करून जिवती तालुक्याची निर्मिती झाली. या तालुक्यात शंकर लोधी हे ३० घरांचे गाव अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे. शंकर लोधी गावाला लागून एक नैसर्गिक गुफा आहे. जैवविविधतेच्या दृष्टीने त्याचे महत्त्व आहे. पर्यटस्थळ म्हणूनही अद्भुत अशी नैसर्गिक रचना बघणे आनंददायक आहे. चुनखडी आणि सॅण्ड स्टोनच्या मिश्रणाचे या जमिनीत पाणी मुरल्याने अशा गुफा तयार होतात, असे अभ्यासक सांगतात. चंद्रपूरपासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर हे गाव आहे.

अशी आहे गुफा

गुफेमध्ये सुमारे १०० फूट आत गेल्यावर पाणी आढळते; परंतु तेवढ्या भागातही गुफेच्या छताला लटकलेले लवण स्तंभ पाहायला मिळते. उन्हाळ्यात गुफेत बरेच आत जाता येते. ज्यांनी आत जाण्याचा प्रयत्न केला, ते सुमारे एक किलोमीटरपर्यंत जाऊ शकतात. आत अंधार, जागोजागी पाणी व प्राणवायूची कमी असल्याने साधनांशिवाय जाणे कठीण आहे. मात्र, या एक किलोमीटर परिसरात अत्यंत निर्मळ पाण्याचे प्रवाह, जमीन व छतावर असलेले लवण स्तंभ, भूलभुलय्यासारखे चकवा देणारे रस्तेही गुफेत आहेत.

कोट

नुकतीच नोव्हेंबर महिन्यात या गुफेला भेट देऊन लहानसा भाग पाहण्याचे धाडस केले. स्वत:ला छत्तीसगडपेक्षा प्रगत समजणाऱ्या महाराष्ट्र व तेलंगणा या दोन्ही राज्यांकडून शंकर लोधीच्या या गुफेची अक्षम्य उपेक्षा सुरू आहे. संवर्धन व विकास तर सोडाच नकाशातदेखील हे गाव नोंदविण्यात आले नाही.

-किशोर जामदार, अभ्यासक, चंद्रपूर

Web Title: The ancient history of Chandrapur will unfold in the cave of Shankar Lodhi