६७ टक्के बाधित १९ ते ४० वयोगटातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 05:01 IST2020-07-28T05:00:00+5:302020-07-28T05:01:50+5:30

मार्च महिन्यापासूनच जिल्ह्यात लॉकडाऊन होते. प्रारंभी लोकांना लॉकडाऊन बरा वाटला. मात्र पुढे लॉकडाऊनचा लोकांना, विशेषता तरुण मंडळींना कंटाळा येऊ लागला. त्यामुळे नियम तोडून, आवश्यकता नसतानाही तरुण घराबाहेर पडू लागले. अनेक तरुण बाहेर जिल्ह्यातूनही परत आले. यात कामगारांचाही समावेश होता. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढून बाधितांची संख्याही वाढली. २६ जुलैपर्यंत जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ४०५ आहे.

67% affected between 19 and 40 years | ६७ टक्के बाधित १९ ते ४० वयोगटातील

६७ टक्के बाधित १९ ते ४० वयोगटातील

ठळक मुद्देसात चिमुकलेही पॉझिटिव्ह : तरुणांनो, सावधान ! घराबाहेर पडू नका

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. यापूर्वी बाहेर जिल्ह्यातून वा बाहेर राज्यातून आलेले व्यक्ती पॉझिटिव्ह म्हणून पुढे येत होते. मात्र आता संपर्कातूनही अनेक जण बाधित होत आहे. जिल्ह्यातील एकूण ४०५ बाधितांपैकी १९ ते ४० वयोगटातील तब्बल २७२ रुग्ण आहेत. ही टक्केवारी ६७.१६ इतकी असल्याने तरुणांनी आताच अलर्ट होणे गरजेचे झाले आहे.
मार्च महिन्यापासूनच जिल्ह्यात लॉकडाऊन होते. प्रारंभी लोकांना लॉकडाऊन बरा वाटला. मात्र पुढे लॉकडाऊनचा लोकांना, विशेषता तरुण मंडळींना कंटाळा येऊ लागला. त्यामुळे नियम तोडून, आवश्यकता नसतानाही तरुण घराबाहेर पडू लागले. अनेक तरुण बाहेर जिल्ह्यातूनही परत आले. यात कामगारांचाही समावेश होता. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढून बाधितांची संख्याही वाढली. २६ जुलैपर्यंत जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ४०५ आहे.
यातील ६७.१६ टक्के म्हणजेच तब्बल २७२ रुग्ण हे १९ ते ४० या वयोगटातील आहेत. यासोबतच ० ते ५ वयोगटातील सात रुग्ण आहेत. ६ ते १८ वयोगटातील २१ रुग्ण, ४१ ते ६० वयोगटातील ९३ रुग्ण आणि ६१ वर्षांवरील १२ रुग्ण आतापर्यंत जिल्ह्यात आढळून आले आहेत. विशेष म्हणजे संपर्कातून बाधित वाढत असल्यामुळे आता जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे.

बाधितांमध्ये पुरुष सर्वाधिक
कोरोना विषाणूचा संसर्ग लहान बालके, वयोवृध्दांनाही झाला आहे. पुरुषांसोबत महिलाही या आजाराला बळी पडल्या आहेत. २६ जुलैपर्यंतच्या एकूण बाधितांपैकी ७५ टक्के रुग्ण पुरुष आहेत. एकूण ४०५ रुग्णांपैकी ३०४ रुग्ण हे पुरुष आहेत तर १०१ रुग्ण महिला आहेत.

तरुणांनो, बेफिकिरी सोडा
सध्या चंद्रपूर जिल्ह्यात बाजारपेठा सुरू झाल्या असल्या तरी लॉकडाऊन कायम आहे. प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये थोडीफार शिथिलता दिली आहे. मात्र ही शिथिलता बाजापेठेतील कमकुवत झालेली आर्थिक उलाढाल पूर्वपदावर येण्यासाठी आहे. नागरिकांना अनावश्यक शहरात, गावात फिरण्यासाठी नाही. असे असले तरी सध्या चंद्रपूर शहरासह सर्व गावांचा विचार केला तर तरुणवर्गच सर्वाधित फिरताना दिसत आहे. आता तर संपर्कातून बाधित होण्याचे प्रकार समोर येत असल्याने तरुणांनी बेफिकिरी सोडून सरकारी नियम पाळण्याची गरज निर्माण झाली आहे.

Web Title: 67% affected between 19 and 40 years