तुरीने अडवला पीआरसीचा दौरा

By Admin | Updated: April 30, 2017 03:15 IST2017-04-30T03:15:39+5:302017-04-30T03:15:39+5:30

३ मे रोजीच्या बैठकीत ठरणार दौर्‍याची तारीख.

Totally interrupted PRC visit | तुरीने अडवला पीआरसीचा दौरा

तुरीने अडवला पीआरसीचा दौरा

अकोला : जिल्हा परिषदेतील कारभाराचा धांडोळा घेणार्‍या विधिमंडळाच्या पंचायत राज समितीचा दौरा दुसर्‍यांदा पुढे ढकलला आहे. समितीचे अध्यक्ष आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे दौर्‍यात बदल होत आहे, असे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात तुरीच्या प्रश्नावरून उठलेल्या गदारोळात समितीला रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे दौरा टाळलेलाच बरा, असा सल्ला स्थानिक राजकारण्यांनी दिल्याने दौरा पुढे ढकलल्याची चर्चा आहे.
पंचायत राज समितीचा यापूर्वी अकोला जिल्हा परिषदेत १६ ते १८ फेब्रुवारीदरम्यान दौरा निश्‍चित झाला होता. त्यावेळी अकोला महापालिकेसाठी २१ फेब्रुवारी रोजी मतदान २३ रोजी मतमोजणीचा कार्यक्रम ठरल्याने दौरा पुढे ढकलण्यात आला होता, तसेच दौरा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात नियोजित करण्याचेही सांगण्यात आले होते.
त्यानंतर हा दौरा थेट मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे ३ ते ५ मे दरम्यान ठरला. आता तो पुन्हा पुढे ढकलला आहे.

स्थानिक राजकारण्यांचा दबाव
राज्यात सर्वत्र तुरीच्या खरेदीमुळे शासन अडचणीत आहे. त्यामुळे संतप्त शेतकरी काहीही करू शकतात, असा शासनाचा अंदाज आहे. अकोला जिल्हय़ातही तुरीच्या मुद्यावरून शेतकरी संतप्त आहेत. त्यातच समितीचा दौरा ग्रामीण भागातही होणार आहे. त्यामुळे कोणत्या क्षणी काय होईल, याचा नेम नाही. त्यासाठी समितीने सध्या दौरा टाळलेलाच बरा, असा दबावासकट आग्रह स्थानिक राजकारण्यांनी धरला. परिणामी, दौरा पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा आहे.

Web Title: Totally interrupted PRC visit