खात्यातून दीड लाख रुपये काढून फसवणूक

By Admin | Updated: May 3, 2017 00:29 IST2017-05-03T00:29:55+5:302017-05-03T00:29:55+5:30

मलकापूर- दुधलगाव बु. येथील उपसरपंच सुरेश झनके या स्टेट बँक आॅफ इंडियाच्या खातेदाराला अज्ञात ठगांनी तब्बल दीड लाख रुपये त्यांच्या खात्यातून परस्पर काढून गंडविले आहे

Removing one and a half million rupees from the account fraud | खात्यातून दीड लाख रुपये काढून फसवणूक

खात्यातून दीड लाख रुपये काढून फसवणूक

मलकापूर: एटीएम कार्ड व खाते बंद होऊन त्या खात्यातील रक्कमसुद्धा काढता येणार नाही, अशी भीतीदर्शक सूचना देत एटीएम कार्डचा नंबर मिळवित दुधलगाव बु. येथील उपसरपंच सुरेश झनके या स्टेट बँक आॅफ इंडियाच्या खातेदाराला अज्ञात ठगांनी तब्बल दीड लाख रुपये त्यांच्या खात्यातून परस्पर काढून गंडविले आहे. याप्रकरणी सुरेश झनके यांनी मलकापूर शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.
२६ व २७ एप्रिलदरम्यान अज्ञात व्यक्तीने सुरेश झनके यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करीत मुंबई स्थित एटीएम कार्डच्या मुख्य कार्यालयातून शर्मा बोलत असल्याची बतावणी करून बँक खात्याविषयी माहिती मिळविण्याकरिता अनामिक भीती निर्माण करीत विश्वास संपादन केला व सर्व माहिती प्राप्त केल्यानंतर त्या ठगाने २७ एप्रिल रोजी ४९ हजार ९९२ रुपये, २८ एप्रिलला ५० हजार रु., २९ एप्रिलला ४४ हजार ९९७ रुपये परस्पर काढून घेतले. दरम्यान २९ एप्रिल रोजी सुरेश झनके बँकेत खात्यातून पैसे काढण्याकरिता रांगेत उभे असतानाही खात्यात शिल्लक असलेले ३ हजार १८८ रुपयेसुद्धा त्या ठगाने काढून घेतले.
सदर रक्कम ही त्या ठगाने वेगवेगळ्या ठिकाणी खरेदीकरिता काढली असल्याचेही बँक अकाउंटच्या स्टेटमेंटवरून स्पष्ट झाले आहे. फसगत झालेल्या झनके यांनी याबाबत बँकेकडे धाव घेत सदर प्रकार अधिकाऱ्यांना कथन केला असता बँक अधिकाऱ्यांनी मात्र कानावर हात ठेवत पोलिसांकडे तक्रार करण्यास सांगितले. या प्रकरणी सुरेश झनके यांनी पो.स्टे.ला फिर्याद दिली आहे.

फसवणुकीनंतरही ‘कॉल’
बँक खात्यातून पैसे काढल्यावर मोबाइलवर मॅसेज येतात; परंतु एवढ्या रकमा निघूनही झनके यांच्या मोबाइलवर मॅसेज धडकले नाहीत. तर अद्यापही तो ठग तुमचे खाते ब्लॉक झाल्याने तुम्हाला तुमच्या खात्यात रक्कम दिसत नाही. तुमचे आणखी खाते असल्यास सांगावे त्यात तुमची रक्कम फॉरवर्ड केल्या जाईल, अशी बतावणी करीत आहे.

Web Title: Removing one and a half million rupees from the account fraud