वाघ महत्वाचा की माणूस?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 06:52 PM2020-08-08T18:52:19+5:302020-08-08T18:52:53+5:30

राष्ट्रीय प्राणी असलेल्या वाघांचे संरक्षण आणि संवर्धन झालेच पाहीजे, पण हे करताना मनुष्यप्राण्याला गौण ठरविता येणार नाही. त्याच्या विकासात्मक गरजांची पूर्तता करावीच लागणार आहे.

Is tiger important or man? | वाघ महत्वाचा की माणूस?

वाघ महत्वाचा की माणूस?

googlenewsNext


मनोज ताजने
गडचिरोली
प्रस्तावित वडसा-गडचिरोली हा रेल्वेमार्ग असो की नागपूर-नागभीड या नॅरोगेज रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करणे असो, माणसांची गरज म्हणून या रेल्वेमार्गांची उभारणी गरजेची आहे. असे असताना केवळ वाघांच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल असे म्हणून ही विकासात्मक कामे जर थांबणार असतील तर वाघ महत्वाचा की माणूस? असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रीय प्राणी असलेल्या वाघांचे संरक्षण आणि संवर्धन झालेच पाहीजे, पण हे करताना मनुष्यप्राण्याला गौण ठरविता येणार नाही. त्याच्या विकासात्मक गरजांची पूर्तता करावीच लागणार आहे.
राज्यात वाघांच्या संख्येसोबत मानव-वन्यजीव संघर्षही वाढत आहे. संरक्षित जंगलाचा परिसर मर्यादित असताना वाघांची संख्या वाढत असल्यामुळे आता हे वाघ संरक्षित क्षेत्राबाहेर पडायला लागले आहेत. परिणामी माणसांच्या जगात झालेला हा वाघांचा शिरकाव अनेक नवीन समस्या निर्माण करत आहेत. त्यावर उपाय शोधताना वाघांचे संवर्धन करण्यासोबतच माणसांचा जीव वाचून विकासात्मक कामांमध्ये वाघ अडसर बनणार नाही, याचीही खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे.

महाराष्ट्रात असलेल्या ३१२ वाघांपैकी सर्वाधिक वाघ चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात आहेत. पण त्यातील एक तृतियांश वाघ प्रत्यक्षात व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित क्षेत्राबाहेर राहात असल्याचा अहवाल राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्थेने दिला आहे. नर वाघ आपले एक क्षेत्र निश्चित करतो. त्या क्षेत्रात दुसऱ्या वाघाला शिरू देत नाही. कोणी शिरण्याचा प्रयत्न केला तर दोन वाघांमध्ये संघर्ष होऊन जो हारेल त्याला ते क्षेत्र सोडावे लागते. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र आता वाघांसाठी कमी पडायला लागल्यामुळे अनेक वाघ संरक्षित क्षेत्राबाहेर पडत आहेत. ताडोबातील वाघ ब्रह्मपुरी तालुक्यातून गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलात शिरले आहेत. गावे आणि शहरालगतच्या जंगलात त्यांचे वास्तव्य वाढत आहे आणि त्यामुळेच मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्यात वाढत आहेत.

वाघांची ही वाढती संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांची नसबंदी करण्याचा प्रस्तावही वन्यजीव मंडळाच्या बैठकीत वनविभागाने ठेवला होता. मात्र शुक्रवार दि.७ ऑगस्टला झालेल्या या बैठकीत व्याघ्रप्रेमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तो प्रस्ताव धुडकावला. त्यापेक्षा काही वाघांना दुसरीकडे हलविण्यावर विचार करण्याचे सूचविण्यात आले. आगामी काळात अनेक वाघांना दुसरीकडे हलविणे अपरिहार्य असले तरी त्यामुळे वाघांपासून असलेला धोका पूर्णपणे टळेल असे होत नाही. कारण वाघांना विशिष्ट क्षेत्रामध्ये बांधून ठेवता येत नाही. स्वत:चे अस्तित्व टिकवण्याच्या प्रयत्नात पुढेही वाघांचा मानवाशी संघर्ष सुरूच राहणार आहे. पण वाघ आहेत म्हणून माणसांसाठी असणाऱ्या गरजांना आवर घालणे कितपत योग्य आहे, याचाही विचार आता गांभिर्याने करावा लागणार आहे.

प्रस्तावित वडसा-गडचिरोली हा रेल्वेमार्ग असो की नागपूर-नागभीड या नॅरोगेज रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करणे असो, माणसांची गरज म्हणून या रेल्वेमार्गांची उभारणी गरजेची आहे. असे असताना केवळ वाघांच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल असे म्हणून ही विकासात्मक कामे जर थांबणार असतील तर वाघ महत्वाचा की माणूस? असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रीय प्राणी असलेल्या वाघांचे संरक्षण आणि संवर्धन झालेच पाहीजे, पण हे करताना मनुष्यप्राण्याला गौण ठरविता येणार नाही. त्याच्या विकासात्मक गरजांची पूर्तता करावीच लागणार आहे. वाघांचे अस्तित्व असणाºया भागात भुयारी रेल्वेमार्ग किंवा उड्डाण पूल करता येऊ शकतो. पण खर्चाचे बजेट वाढत असल्याचे सांगत ते कामच ठप्प ठेवणे योग्य नाही.

केंद्र सरकारमधील एक वजनदार मंत्री म्हणून ओळख असणारे नितीन गडकरी यांना विदर्भातील या प्रश्नांची जाण आहे. त्यांचा त्या विषयांवर अभ्यासही आहे. रेल्वे, वन आणि वन्यजीव कायद्याच्या अडचणी हे केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विषय आहेत. त्यामुळे या समस्या रेंगाळत न ठेवता त्यांनी आपले वजन वापरून त्या निकाली काढणे अपेक्षित आहे.

Web Title: Is tiger important or man?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ