दहा महिन्यांनंतर शाळांत किलबिलाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:40 IST2021-02-05T08:40:24+5:302021-02-05T08:40:24+5:30

शैक्षणिक सत्र संपण्याच्या मार्गावर असताना कोरोनाने पाय रोवला. मार्च महिन्यापासून शाळा बंद पडल्या. तब्बल दहा महिने घरी बसून विद्यार्थी ...

Twitching in schools after ten months | दहा महिन्यांनंतर शाळांत किलबिलाट

दहा महिन्यांनंतर शाळांत किलबिलाट

शैक्षणिक सत्र संपण्याच्या मार्गावर असताना कोरोनाने पाय रोवला. मार्च महिन्यापासून शाळा बंद पडल्या. तब्बल दहा महिने घरी बसून विद्यार्थी कंटाळले होते. ऑनलाईन शिक्षणाने त्यात मदत झाली. तरी दुधाची तहान ताकाने भागणार कशी? जिल्ह्यात पाचवी ते आठवीच्या ७०९ शाळा असून, त्यात ६९ हजार ५५७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बुधवारी जिल्ह्यातील ६८७ शाळा सुरू झाल्या. ३० हजार ५०१ विद्यार्थ्यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी हजेरी लावली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर टप्प्याटप्प्याने शिक्षकांची कोरोना चाचणी केली जात आहे. २६५४ शिक्षकांपैकी २४९५ शिक्षकांची चाचणी करण्यात आली. १३ शिक्षक पाॅझिटिव्ह आढळून आले. एकंदरीत दहा महिन्यांनंतर सुरू झालेल्या शाळेत विद्यार्थ्यांचा किलबिलाट ऐकून शिक्षकही तृप्त झाले.

कोरोना संकटानंतर सगळ्या विद्यार्थ्यांना भेटताना ऊर भरून आला. मी विद्यार्थ्यांना भेटून प्रत्यक्ष अध्यापन कधी करतो याची प्रतीक्षा करीत होतो. शाळेत आज मुलांच्या प्रतिसादाने आनंदमय वातावरण निर्माण झाले. विद्यार्थी उत्साहात दिसत होते.

-महादेव कुबडे, शिक्षक

दहा महिन्यांपासुन थांबलेला किलबिलाट आजपासून सुरू झाला. मुलांच्या येण्याने शाळेला जिवंतपणा आला. शाळेत वेगळाच उत्साह दिसला. शिक्षक व विद्यार्थी आनंदून गेले होते. आता विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहता येणार आहे.

-सुनंदा वाढिवे, शिक्षिका

खूप आनंद झाला

पहिल्या दिवशी आम्ही शाळेत पोहोचलो. आमच्या मॅडमने आमचे स्वागत केले. तीन - चार दिवसांपासून शाळेत कधी जातो याची हुरहुर लागली होती. शाळेत पहिले पाऊल ठेवताच मला खूप आनंद झाला.

-नयना धांडे, विद्यार्थिनी

कोरोनामुळे घरी राहून कंटाळलो होतो. सगळ्या मित्रांना कधी भेटतो याची वाट बघत होतो. आज मित्र व माझ्या सर्व शिक्षकांना भेटून खूप आनंद वाटला. शाळेत खूप मज्जा केली.

-पीयूष भोयर, विद्यार्थी

Web Title: Twitching in schools after ten months