साकोलीला वादळी पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 06:00 AM2020-02-26T06:00:00+5:302020-02-26T06:00:35+5:30

सोमवारी सायंकाळी अचानक साकोली शहरासह तालुक्यात वादळी पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी ६ वाजता पावसासोबत बोराच्या आकाराचा गारांचा वर्षाव झाला. वादळात ग्रामीण भागातील अनेक घरावरील टिनपत्रे उडाली आहेत. तर साकोली येथील शामराव बापु कापगते महाविद्यालयावरील टिनाचे शेड उडून गेले. सुदैवाने यावेळी महाविद्यालयात कुणीही उपस्थित नव्हते.

Stormy rain hit Sakoli | साकोलीला वादळी पावसाचा तडाखा

साकोलीला वादळी पावसाचा तडाखा

googlenewsNext
ठळक मुद्देरबी पिकाचे नुकसान : वादळात महाविद्यालयाचे छत उडाले, शेतकरी धास्तावले

लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : वादळी पावसासह गारपिटीचा साकोली तालुक्याला सोमवारी सायंकाळी जोरदार तडाखा बसला. वादळाने अनेक घरांवरील टिनपत्रे उडाली. तर गारपिटीने गहू, हरभरासह उन्हाळी धानपिकाचे नुकसान झाले.
सोमवारी सायंकाळी अचानक साकोली शहरासह तालुक्यात वादळी पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी ६ वाजता पावसासोबत बोराच्या आकाराचा गारांचा वर्षाव झाला. वादळात ग्रामीण भागातील अनेक घरावरील टिनपत्रे उडाली आहेत. तर साकोली येथील शामराव बापु कापगते महाविद्यालयावरील टिनाचे शेड उडून गेले. सुदैवाने यावेळी महाविद्यालयात कुणीही उपस्थित नव्हते. साकोलीतील फुटपाथवर असलेल्या दुकानदारांचे पाल या वादळात उडून गेले. गारपिटीचा तडाखा तालुक्यातील सेंदुरवाफा, परसोडी, लवारी, उमरी, कुंभली, धर्मापूरी आदी गावांना बसला. बोराच्या आकाराचा या गारांमुळे गहू, हरभरा, उन्हाळी धान व भाजीपाला पिकाचे नुकसान झाले आहे. दरम्यान मंगळवारी पुन्हा सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली.
जिल्ह्यात अवकाळी पाऊस
भंडारा : मोहाडी, तुमसर, साकोली, पवनी आदी तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. मोहाडी तालुक्यातील लोहारा व जांब परिसरात सोमवारी सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दिघोरी मोठी येथे रिमझिम पाऊस बरसला. भंडारा शहरातही पावसाची सर कोसळली.
उघड्यावरील धान ओला
धान निघाला तेव्हापासून जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर सुरु आहे. अनेक शेतकऱ्यांचा धान आजही आधारभूत केंद्रावर उघड्यावर आहे. अवकाळी पावसाने अनेक केंद्रावरील धान ओला झाला. ढगाळ वातावरण निर्माण होताच धान झाकण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ दिसत होती.

जिल्ह्यात ६.५ मिमी पावसाची नोंद
जिल्ह्यात ६.५ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली. सर्वाधिक पाऊस साकोली आणि भंडारा तालुक्यात नोंदविण्यात आला. भंडारा येथे ४.५ मिमी तर साकोली येथे ४.६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. पवनी तालुक्यात २.२ मिमी तर मोहाडी तालुक्यात ०.७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. सर्वाधिक पाऊस एकोडी कृषी मंडळात नोंदविण्यात आला. येथे ११.६ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली.

Web Title: Stormy rain hit Sakoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस