डिजिटल शाळांची लोकचळवळ उभारा

By Admin | Updated: April 26, 2017 00:36 IST2017-04-26T00:36:50+5:302017-04-26T00:36:50+5:30

सध्याचे युग तंत्रज्ञानाचे युग आहे. झपाटयाने बदलत असलेल्या इंटरनेटच्या युगात जिल्हा परिषद शाळा मागे पडता कामा नये.

Raise the vision of digital schools | डिजिटल शाळांची लोकचळवळ उभारा

डिजिटल शाळांची लोकचळवळ उभारा

नाना पटोले यांचे प्रतिपादन : अधिकाऱ्यांनी शाळांना भेट द्यावी, विद्यार्थी-अधिकारी संवाद व्हावा
भंडारा : सध्याचे युग तंत्रज्ञानाचे युग आहे. झपाटयाने बदलत असलेल्या इंटरनेटच्या युगात जिल्हा परिषद शाळा मागे पडता कामा नये. ग्रामीण भागातील विद्यार्थीसुध्दा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भरारी घेऊ शकतो, यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा किंवा शासनाने पुढे येऊन चालणार नाही तर नव्या युगासोबत आपला पाल्य प्रगती करावा म्हणून डिजीटल क्रांतीसाठी पालक सहभाग वाढविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांशी चर्चा करतांना ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत खासदार नाना पटोले यांनी चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी सुहास दिवसे, जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू, मुख्य कायर्कारी अधिकारी शदर अहिरे, उपवनसंरक्षक उमेश वर्मा, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता प्रसाद नार्वेकर उपस्थित होते.
यावेळी नाना पटोले म्हणाले, पालकांच्या सहभागाने जिल्ह्यातील शाळांमध्ये डिजीटल लोकचळवळ उभी राहणार आहे याचा फायदा नव्या पिढीला सक्षम व विकसित करण्यासाठी होणार आहे. डिजीटल शाळांसाठी केंद्र व राज्य शासन निधी देते. मात्र यासाठी पालकांनी सुध्दा सहभाग घेणे गरजेचे आहे. पाल्याला डिजीटल शिक्षण मिळावे ही ईच्छा पालकांना असायला हवी. त्याशिवाय डिजीटल शाळा संकल्पना पूर्णत्वास जाणार नाही. पालकांच्या सहभागातून डिजीटल शाळांची लोकचळवळ उभी रहावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना वेगळया प्रोफेशनची माहिती देणे आवश्यक आहे. मुलांचा कल कुणीकडे आहे याची माहिती करुन घेतल्यास विद्यार्थी घडविण्यासाठी मदत होईल, असे ते म्हणाले.
जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शासकीय दौऱ्यादरम्यान शाळांना भेटी द्याव्यात व मुलाशी संवाद साधावा जेणेकरुन मुलांना प्रोत्साहन मिळेल. तसेच शासकीय अधिकारी व शासन याबाबत त्यांना जवळून जाणून घेता येईल, असे त्यांनी नमूद केले.
मामा तलावाची योग्य खोलीकरण करण्यात यावे तसेच गाळ काढण्यात यावा. यामुळे मामा तलावात पाणी मोठया प्रमाणात साठवणूक होईल. मामा तलावात मत्स्य व्यावसाय करण्याला मोठया प्रमाणात वाव असून यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. जिल्हयात सरासरी १२०० मि.ली. पाऊस पडत असून तरीही पाणी टंचाई का निर्माण होते यावर विचार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
जलयुक्त शिवारची कामे करतांना वन तलावाला प्राधान्य देण्यात यावे. जिल्हयात ५५ वन तलाव असून या तलावाचे खोलीकरण केल्यास पाणी साठून पाणी पातळीत वाढ होऊ शकते. याचबरोबर पाणलोट विकास कार्यक्रम मोठया प्रमाणात हाती घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचा शासनाचा मानस असून आदर्श पुनर्वसन व पुनर्वसन झालेल्या गावात सोईसुविधा पुरविण्याला प्राधान्य देण्यात यावे. बावनथडी प्रकल्पासाठी केंद्र सरकाने मोठया प्रमाणात निधी दिला आहे. ती कामे सुध्दा तातडिने पुर्ण होणे आवश्यक आहे,असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Raise the vision of digital schools