जप्तीच्या वाहनांना भंगाराचे स्वरूप

By Admin | Updated: December 4, 2014 23:04 IST2014-12-04T23:04:52+5:302014-12-04T23:04:52+5:30

जप्त केलेल्या वाहनांवर न्यायालयाचा ताबा असतो. न्यायालयाच्या आदेशानुसार वाहने सोडली जातात. पोलिसच वाहनांची रखवाली करतो. बेवारस वाहने असतील तर त्यांचा लिलाव केला जातो.

The nature of the breach of seizure vehicles | जप्तीच्या वाहनांना भंगाराचे स्वरूप

जप्तीच्या वाहनांना भंगाराचे स्वरूप

भंडारा : जप्त केलेल्या वाहनांवर न्यायालयाचा ताबा असतो. न्यायालयाच्या आदेशानुसार वाहने सोडली जातात. पोलिसच वाहनांची रखवाली करतो. बेवारस वाहने असतील तर त्यांचा लिलाव केला जातो. वेगवेगळ्या गुन्हयांमध्ये पोलिसांनी जप्त केलेली वाहने भंडारा व अन्य पोलिस ठाण्यात गेल्या अनेक वर्षापासून तशीच धूळखात पडून आहेत.
वाहनांना गंज लागला असल्याने अनेक वाहने भंगारात जमा झाली असून अनेकांचे स्पेअरपार्ट गायब आहेत. पोलिसांनी अपघात, चोरी इ. वेगवेगळ्या प्रकरणात मुद्देमाल म्हणून वाहने जप्त केली आहेत. २००१ पासून अद्यापपर्यंत जप्त केलेल्या वाहनांची संख्या मोठी आहे. यात दुचाकीचे प्रमाण सर्वाधिक आहे. जप्त केलेल्या वाहनांचे मुळ मालक पोलिसांना अद्याप सापडले नसल्याने व वाहन मालकांनीही वाहने परत आणण्याची तसदी न घेतल्यामुळे ही वाहने पोलिस ठाण्यात गेल्या अनेक वर्षांपासून तशीच पडून आहेत.
जप्त केलेली वाहने मुळे मालकाने वाहनांची कागदपत्रे सादर केल्यास न्यायालयाच्या आदेशानुसार दंड भरुन मालकाला परत दिली जातात. परंतु वाहनाचे मुळ मालक न मिळाल्यास न्यायालयाच्या परवानगीने या वाहनांचा लिलाव केला जाऊ शकतो. या लिलावातून शासनाला आर्थिक फायदाही होतो. परंतु या वाहनासंदर्भात संबंधित प्रशासनाकडून तसे काही प्रयत्न झालेले दिसत नाहीत. त्यामुळेच अनेक वर्षापासून तशीच पडून असलेल्या वाहनांना गंज चढला आहे.
अनेक दुचाकी व अन्य वाहने गंज लागून जीर्ण होत आहेत. विशेष म्हणजे यातील अनेक वाहनांचे चक्क स्पेअरपार्टच गायब झाले आहेत. पोलिस ठाण्यातून वाहनांचे सुटे भाग कसे काय जातात. असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
वेगवेगळ्या प्रकरणात पोलिसांनी जप्त केलेली वाहने परत नेण्याकडे वाहन मालकांचे दुर्लक्ष आहे. अपघात झालेले वाहन अपशकुन समजून ते वाहन परत नेण्यासाठी मालक उत्सुक नसतात.
ते वाहन पोलिस ठाण्यात तसेच पडून राहते. चोरीचे वाहन रस्त्यावर तसेच सोडले जाते. बेवारस म्हणून ते ठाण्यात जमा केले जाते. त्याची मालकाला माहिती नसल्याने ते पोलिस ठाण्यात राहते. (प्रतिनिधी)

Web Title: The nature of the breach of seizure vehicles