भंडारा : हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेत आईच्या डोळ्यासमोरच बिबट्याने ५ वर्षाच्या चिमुरडीला जबड्यात पकडून उचलून नेल्याची धक्कादायक घटना बुधवारी, दि. १५ एप्रिलला पहाटे घडली. या हल्ल्यात अंशिका काशीनाथ मिरी या ५ वर्षीय बालिकेचा जागीच मृत्यू झाला. साकोली तालुक्यातील विर्शी या गावालगत वीटभट्टीवर ही घटना घडली.
छत्तीसगडमधील बालोदाबाजार जिल्ह्यातील सुहेला येथील मूळचे रहिवासी असलेले काशीनाथ मिरी यांचे कुटुंब विर्शी येथील संजय कापगते यांच्या शेतात वीटभट्टीच्या कामासाठी लगतच झोपडी उभारून वास्तव्यास आहे. बुधवारी पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास सर्व कुटुंबीय कामासाठी उठले होते.
घटनेच्या वेळी अंशिकाची आई ब्रश करत असताना अंशिका झोपडीसमोरच खेळत होती. मक्याच्या शेतातून दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घातली अन् क्षणातच अंशिकाला जबड्यात पकडून उचलून नेले.
कुटुंब बिबट्यामागे धावले, अंशिकाला वाचवू शकले नाही
अगदी आईच्या डोळ्यादेखतच हा प्रकार घडल्याने, आईने आक्रोश करत आरडाओरड केली. बिबट्याच्या पाठोपाठ या कुटुंबाने धाव घेतली. यामुळे काही अंतरावर मक्याच्या शेतात मुलीला सोडून बिबट्याने पळ काढला. मात्र, तोपर्यंत अंशिकाचा मृत्यू झाला होता. तिच्या अगदी मानेवरच खोल जखमा झाल्या होत्या.नियतीला ते मान्य नव्हते..
दुपारी वीटभट्टीवरील काम आटोपल्यावर काशीनाथ मिरी हे सहकुटुंब छत्तीसगडमधील सुहेला या स्वगावी निघणार होते. आनंदाने त्यांची तयारी सुरू होती. मात्र, नियतीला हे मान्य नसावे. आनंदाने जाण्याऐवजी आक्रंदन करीत बालिकेचे कलेवर घेऊन जाण्याची वेळ त्यांच्यावर आली.
बिबट्याचीही दहशत
साकोली तालुक्यातील बांपेवाडा, उमरझरी, आगमाव या परिसरात टी-२७ या वाघिणीची मागील महिनाभरापासून दहशत आहे. तिने दोघांचे बळी घेतले असून, अद्यापही वनविभागाला ती सापडलेली नाही. अशातच आता बिबट्याच्या हल्ल्याची भर पडल्याने परिसरातील नागरिक प्रचंड धास्तावले आहेत.
दुपारी साकोली येथे शवविच्छेदन झाल्यावर अंशिकाचा मृतदेह घेऊन कुटुंबीय छत्तीसगडकडे रवाना झाले. वनविभागाने २० हजार रुपयांची तत्काळ मदत करून शववाहिकेची व्यवस्था करून दिली. मिरी कुटुंबीयाला वनविभागाच्या धोरणानुसार २५ लाख रुपयांची मदत दिली.
Web Summary : In Bhandara, a leopard attacked and killed a 5-year-old girl playing near her mother. The family, working at a brick kiln, chased the leopard but couldn't save her. The incident has spread fear in the region already grappling with tiger T-27.
Web Summary : भंडारा में तेंदुए ने माँ के पास खेल रही 5 साल की बच्ची पर हमला कर मार डाला। ईंट भट्ठे पर काम करने वाला परिवार तेंदुए के पीछे भागा लेकिन उसे बचा नहीं सका। बाघ टी-27 से पहले ही जूझ रहे क्षेत्र में घटना से दहशत फैल गई है।