शेतातील पिक जळताना पाहून शेतकरी धावला; आगीच्या विळख्यात येऊन दुर्दैवी मृत्यू

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: May 19, 2026 18:52 IST2026-05-19T18:51:55+5:302026-05-19T18:52:29+5:30

Bhandara : साकोली शहराला लागून असलेल्या लाखांदूर रोड परिसरातील मक्याच्या शेताला आग लागली. डोळ्यादेखत पिक जळताना पाहून शेतकरी आग विझवायला धावला.

Farmer ran after seeing crops burning in his field; died in the fire | शेतातील पिक जळताना पाहून शेतकरी धावला; आगीच्या विळख्यात येऊन दुर्दैवी मृत्यू

Farmer ran after seeing crops burning in his field; died in the fire

साकोली (भंडारा) : साकोली शहराला लागून असलेल्या लाखांदूर रोड परिसरातील मक्याच्या शेताला आग लागली. डोळ्यादेखत पिक जळताना पाहून शेतकरी आग विझवायला धावला. मात्र त्या आगीत सापडल्याने शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाला. रामदास गोखलू निंबेकर (६५, तलाव वॉर्ड, साकोली) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून ही हृदयद्रावक घटना मंगळवार, १९ मे रोजी सकाळी १०:२५ वाजताच्या सुमारास घडली.

रामदास निंबेकर यांचे शेत रस्त्यालगत आहे. शेतामध्ये त्यांनी मक्याचे पिक लावले होते. परिपक्व झालेले पिक सुकण्याच्या बेतात असतानाच अचानकपणे शेताला आग लागली. संपूर्ण पिकच आगीत जळायला लागले. हे पाहून त्यांनी पिक वाचविण्यासाठी धाव घेतली. मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने ते आगीच्या विळख्यात सापडले. यात त्यांचा होरपळून अंत झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. आगीमधून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, मात्र आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने नागरिकांचे प्रयत्न निष्फळ ठरले. 

माजी नगरसेवक हेमंत भारद्वाज यांनी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन पथकाने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र, शेतकरी रामदास निंबेकर यांना वाचविण्यात यश आले नाही. आगीत शेतातील झालेल्या नुकसानीची पाहणी तलाठ्यांनी करून नोंद घेतली.

आगीचे कारण अस्पष्ट

वणव्यामुळे आग लागली की अन्य कारणामुळे, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. माहिती मिळताच साकोली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी साकोली उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Web Title : जलते फसल को बचाने में किसान की आग में झुलसकर मौत

Web Summary : साकोली में, एक किसान अपने मक्का के खेत में आग बुझाने की कोशिश करते समय जल गया। रामदास निंबेकर, 65, आग की चपेट में आ गए और उनकी मृत्यु हो गई। आग लगने का कारण अज्ञात है, जांच जारी है।

Web Title : Farmer Dies in Fire While Trying to Save Burning Crop

Web Summary : In Sakoli, a farmer died trying to extinguish a fire in his cornfield. Ramdas Nimbekar, 65, was caught in the blaze and succumbed to his injuries. The fire's cause is unknown, and an investigation is underway.