बांधकाम, रोहयोच्या मुद्यावर ग्रामसभेत गोंधळ

By Admin | Updated: May 2, 2017 00:51 IST2017-05-02T00:51:56+5:302017-05-02T00:51:56+5:30

खुटसावरी येथे महाराष्ट्र दिनी आयोजित ग्रामसभेत शौचालय बांधकाम, रोहयो यासह अनेक मुद्दयावर चांगलाच गोंधळ उडाला.

Confusion in Gram Sabha on the issue of construction, ROHO | बांधकाम, रोहयोच्या मुद्यावर ग्रामसभेत गोंधळ

बांधकाम, रोहयोच्या मुद्यावर ग्रामसभेत गोंधळ

खुटसावरी ग्रामस्थांमध्ये असंतोष : गदारोळानंतर ग्रामसेवक-रोजगार सेवक पळाले
भंडारा : खुटसावरी येथे महाराष्ट्र दिनी आयोजित ग्रामसभेत शौचालय बांधकाम, रोहयो यासह अनेक मुद्दयावर चांगलाच गोंधळ उडाला. पदाधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यानंतर झालेल्या गदारोळामुळे ग्रामसेवक, रोजगार सेवक निघून गेले. त्यामुळे उपस्थित ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. शौचालय बांधकाम, रोहयोच्या कामात झालेल्या गैरव्यहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा कुलूपबंद आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
भंडारा तालुक्यातील खुटसावरी येथे सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास ग्रामसभेचे आयोजन ग्रा.पं. कार्यालयात करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाने दिली होती. मात्र ग्रामसभा वेळेवर सुरु झाली नाही. यावेळी कार्यालयात ग्रामस्थांची गर्दी उसळली होती. गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने ऐनवेळेवर सभेचे स्थळ बदलविण्यात आले. भर उन्हात जिल्हा परीषद शाळेच्या पटांगणात सभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच विजय वासनिक होते. ग्रामसेवक एस. एस. हातझाडे, पोलीस पाटील संघदीप भोयर, तंमुस अध्यक्ष पुरुषोत्तम गिऱ्हेपुंजे यांच्यासह ग्रामपंचायत, तंटामुक्त समिती, बचत गट व विविध समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. सभेची सुरुवात ग्रामसेवकांनी मागील सभेच्या विषयाच्या वाचनाने केली. अपंग लाभार्थ्यांना रक्कमेचे वितरण करण्यात आले. त्यानंतर धनराज गायधनी यांनी शौचालय बांधकाम, रोहयो कामात गैरव्यवहाराचे पुरावे असताना त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली असता उपस्थित ग्रामस्थांनी त्यांचे समर्थन केले. यावर ग्रामसेवक यांनी सभेचे अध्यक्ष उत्तर देतील, असे सांगितले. सरपंच उत्तर देत असताना रोजगार सेवक खुलासा करीत असतानाच एकच गोंधळ उडाला. त्यानंतर ग्रामसेवक, रोजगार सेवक हे सभा सोडून निघून गेले. त्यामुळे ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. ग्रामस्थांनी सभास्थळी चर्चा करुन थेट ग्रामपंचायत कार्यालयात गर्दी केली. तेथे सरपंचांनी ग्रामस्थांना समजविण्याचा प्रयत्न केला. शौचालय बांधकाम, रोहयोच्या कामात झालेल्या गैरव्यहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, रोजगार सेवकाचे पद बदलवून नव्याने नियुक्ती करावी, या मागणीवर ठाम होते. पुढील सभेत चर्चा करु, असे आश्वासन सरंपचांनी दिले. यावर ग्रामस्थांचे समाधान झाले नाही. गदारोळातच सभा आटोपली. दारुबंदीसह अनेक निर्णय होऊ शकले नाही. गावातील शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी तंमुस पदाधिकाऱ्यांनी केली.(नगर प्रतिनिधी)

ग्रामसभेदरम्यान करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे आहेत. शौचालय बांधकाम गैरव्यवहाराचा एकतरी पुरावा द्यावा. सभेत गदारोळ करुन प्रश्न सुटणार नाहीत. गावाच्या विकासासाठी सहकार्य करा.
-विजय वासनिक, सरपंच , खुटसावरी
ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्रामसभेत नियोजित विषयावर चर्चा करण्यात आली. अध्यक्षांच्या परवानगीने येणारे विषय उशीरा प्राप्त झाल्यामुळे ते विषय पुढील सभेत घेण्याचे ठरले. टेकेपार येथे सकाळी ११.३० वाजताची ग्रामसभा असल्याने निघून गेलो. त्यामुळे ग्रामसभा सोडून गेल्याचा मुद्दाच नाही.
- एस.एस.हातझाडे, ग्रामसेवक, खुटसावरी

Web Title: Confusion in Gram Sabha on the issue of construction, ROHO