तीन साधू होते. ते गावोगाव हिंडत असत. कोणत्याही गावात पोहोचल्यावर गावाच्या मधोमध उभे राहून जोरजोरात हसायला सुरुवात करत असत. आजूबाजूने जाणारे लोक त्यांच्याकडे बघत आणि त्यांचे खो खो हसणे पाहून आपणही खुदु खुदु हसून पुढे जात असत. दिवसाच्या सुरुवातीला चेहऱ्यावर उमटलेले हे निर्व्याज हसू त्यांना दिवसभर ऊर्जा देत असे.
हे तीन साधू हास्याचे कारंज घेऊन गावोगावी जात असत. ते हसण्याशिवाय बाकी कुणाशीही काहीच बोलत नसत. कोणाच्या अध्यात मध्यात नसणारे हे साधू आणि त्यांची लोकांना आनंद देण्याची कला पाहून लोक त्यांना आदराने वागवत असत.
गावोगाव हिंडताना एक दिवस त्यांच्यातला एक साधू मृत्यू पावल्याची वार्ता पसरली. साधूंना मानणारा मोठा वर्ग होता. लोक मजल दरमजल करत त्या गावी पोहोचले. नेहमी खो खो हसणारे साधू आपल्या सहकाऱ्याच्या निधनाने आज रडताना दिसणार अशी लोकांना अपेक्षा होती. पण झाले उलटेच!
दोन साधू तिसऱ्या साधूच्या मृतदेहाच्या बाजूला बसून आणखीनच जोरजोरात हसत होते. ते पाहून लोकांना आश्चर्य वाटले आणि त्यांचे वागणे विचित्र वाटले. त्यांच्यातल्या एकाने धीर करून दोन साधूंना या दुर्दैवी क्षणी हसण्याचे कारण विचारले, तेव्हा त्यांच्यातला एक साधू पहिल्यांदा लोकांच्या प्रश्नाला उत्तर देत म्हणाला, आमची कालच बोलणी सुरु होती, कोण आधी मरणार आणि कोणावर शोकसभा घेण्याची वेळ येणार...!
मुळात आमचा आणि शोक करण्याचा संबंध नाही. आम्ही सदा सर्वकाळ हसत असतो. त्या साधुलाही हे माहीत होते, तरीही त्याने अशी पैज लावल्याने आम्ही खूप हसलो आणि आता बघा आम्हाला विचारणारा स्वतःच मृत्युमुखी पडला आहे! काय सांगावे, उद्या आमचाही क्रमांक असेल!
त्यांच्या बोलण्यातले तत्वज्ञान, अध्यात्म ओळखून गावकऱ्यांनी गेलेल्या साधच्या अंत्य संस्काराची तयारी सुरु केली. तेव्हा दोन साधू म्हणाले, त्याचे कपडे बदलत बसू नका, त्याचे देहरूपी कपडे आता चितेत जाळून भस्म होईल आणि आत्मा अमर होईल. गावकऱ्यांनी तसेच केले आणि काय आश्चर्य! देहाला अग्नी दिल्या क्षणीच तेजस्वी ऊर्जेचे वलय निर्माण झाले. तिन्ही साधू त्या ऊर्जेत समरसून गेले. लोकांनी त्यांच्या जाण्याची हळहळ व्यक्त केली पण त्यांचा संदेश लक्षात ठेवून मोठमोठ्याने हसून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
तात्पर्य : आयुष्यात अनेक प्रकारची संकटं येतच राहणार, म्हणून उदास न होता हसत हसत प्रत्येक परिस्थितीला सामोरे जा, रोज हसा, स्वतः कडे बघून हसा. आयुष्य वाढेल आणि नकारात्मकता दूर होईल!
Web Summary : Three laughing monks traveled, spreading joy. One died, yet the others laughed, revealing a philosophy of embracing life and death with humor. Villagers learned to face adversity with a smile.
Web Summary : तीन हंसमुख साधु आनंद फैलाते हुए यात्रा करते थे। एक की मृत्यु हो गई, फिर भी अन्य हँसे, जीवन और मृत्यु को हास्य के साथ अपनाने का दर्शन प्रकट करते हुए। ग्रामीणों ने मुस्कान के साथ विपरीत परिस्थितियों का सामना करना सीखा।