Motivational Story: भूतकाळावरून भविष्याचा वेध घेणं थांबवा; चुकाल, हराल, अपयशी व्हाल; कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 07:10 IST2026-05-08T07:07:00+5:302026-05-08T07:10:02+5:30
Motivational Story: मनुष्याला भूतकाळात रमायची सवय असते, मात्र भविष्यात वेगळेच काही वाढून ठेवले असते, त्यामुळे भूतकाळावरून भविष्याचा वेध घेण्याआधी ही गोष्ट वाचा!

Motivational Story: भूतकाळावरून भविष्याचा वेध घेणं थांबवा; चुकाल, हराल, अपयशी व्हाल; कारण...
दोन मित्र होते. अध्यात्माचा अभ्यास करत होते. एकाच्या मनात केवळ शिकण्याची जिद्द होती तर दुसऱ्याच्या मनात त्याच्यापुढे जाण्याची महत्त्वाकांक्षा होती. मात्र तो पहिल्या मित्राच्या हुशारीला तोड देऊ शकत नव्हता. त्याचे गूढ बोलणे ऐकून त्यावर प्रत्युत्तर देण्याइतकी दुसऱ्याची योग्यता नव्हती.
हे ही वाचा : Numerology: प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाच्या कामाला जाताना मूलांकानुसार 'हे' रंग टाळा!
एकदा पहिला मित्र खांद्यावर झोळी घेऊन निघाला होता. त्याला पाहून दुसऱ्याने विचारले, 'कुठे चाललास?'
पहिला म्हणाला, 'माहित नाही, हवा जिथे नेईल तिथे मी चाललो, एखाद्या वाळलेल्या पानासारखा!'
दुसऱ्याला त्याचे उत्तर उमगले नाही. तो विचार करत राहिला. दुसऱ्या दिवशी त्याने परत त्याला बाहेर जाताना अडवलं आणि म्हणाला, 'हवा तर निघून गेली, तू कुठे चाललास?'
पहिला म्हणाला, 'जिथे पाय नेतील तिथे चाललो!'
निरुत्तर झालेला तो तिसऱ्या दिवशी म्हणाला, 'तुला पायच नसते तर तू कुठे गेला असतास?'
पहिला म्हणाला, 'माहीत नाही, कदाचित इथेच बसून राहिलो असतो. पण पाय आहेत तर आता बाहेर फिरून येतो.'
हे ही वाचा : Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न
हे ऐकल्यावर दुसरा मित्र आपल्या गुरूंकडे जाऊन म्हणाला, 'हा बाहेर निघाला होता तर हेच उत्तर त्याने पहिल्या दिवशी न देता गूढ काहीतरी सांगत बसला. म्हणून ते उत्तर लक्षात ठेवून दुसऱ्या दिवशी प्रश्न विचारला, तर त्यावरही गूढ उत्तर दिल. मी तेही उत्तर लक्षात ठेवून तिसऱ्या दिवशी विचारलं तर सरळ उत्तर देत 'बाहेर निघालो म्हणाला' हा माणूसच गूढ म्हणावा की याचे बोलणे गूढ आहे? कसे कळणार?
गुरुजी म्हणाले, 'अरे वेड्या तू त्याच्या उत्तरांमुळे गोंधळला आहेस. पण लक्षात ठेव, जसे तुझे प्रश्न तीनही दिवस वेगळे होते तसे त्याचे उत्तर वेगवेगळे मिळाले. यात तो माणूस गूढ नाही कि त्याचे उत्तरही गूढ नाही!' गूढ असतो तो भूतकाळ! तो काल काय बोलला यावरून आज तू त्याच्या वागण्याचा अंदाज घेत राहिलास यातच चुकलास. अध्यात्म सांगते, 'भूतकाळावर विसंबून राहू नका, भविष्याचा वेध घेत स्वप्नरंजन करू नका, जे आहे ते वर्तमानात जगा, कारण आज आत्ता हातात असलेला क्षण आपला आहे आणि त्याचे आपल्याला सोने करायचे आहे! प्रत्येक दिवस नवीन संधि असते. व्यक्ति, परिस्थिति यांना नव्याने सामोरे जा, नवीन आव्हाने स्वीकारा आणि नवीन शिकण्याची तयारी ठेवा!कळलं का?