Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 11:11 IST2026-04-22T11:08:30+5:302026-04-22T11:11:41+5:30
Ganga Saptami 2026: पापांचे क्षालन आणि अक्षय पुण्याची प्राप्ती करून देणारा महामुहूर्त, गंगा स्नान शक्य नाही? घरी 'असा' करा पूजा विधी.

Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
गंगा सप्तमी(Ganga Sapatami 2026) जिला गंगा जयंती असेही म्हणतात. हा दिवस हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमीला गंगा नदीचे पृथ्वीवर पुनरागमन झाले होते, म्हणून हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. येथे २३ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या गंगा सप्तमीबद्दलची सविस्तर माहिती, शुभ मुहूर्त आणि पुजेचे महत्त्व दिले आहे.
हे ही वाचा : गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
पौराणिक कथेनुसार, जेव्हा गंगा नदी स्वर्गलोकातून पृथ्वीवर आली, तेव्हा तिचा वेग इतका प्रचंड होता की वाटेत जह्नु ऋषींचा आश्रम वाहून गेला. यामुळे क्रोधित झालेल्या ऋषींनी गंगेला पिऊन टाकले. नंतर देवांच्या आणि भगीरथाच्या विनंतीवरून ऋषींनी वैशाख शुक्ल सप्तमीला आपल्या कानातून गंगेला पुन्हा मुक्त केले. म्हणून या दिवसाला गंगेचा 'पुनर्जन्म' किंवा 'जाह्नवी सप्तमी' असेही म्हटले जाते.
गंगा सप्तमी २०२६: तारीख आणि शुभ मुहूर्त
| महत्त्वाचा तपशील | वेळ / मुहूर्त |
|---|---|
| तारीख | गुरुवार, २३ एप्रिल २०२६ |
| सप्तमी तिथी प्रारंभ | २२ एप्रिल, रात्री १०:४९ वाजता |
| सप्तमी तिथी समाप्त | २३ एप्रिल, रात्री ०८:४९ वाजता |
| पवित्र स्नान मुहूर्त | सकाळी ०५:४८ ते सकाळी ०७:२६ पर्यंत |
| गंगा पूजन (मध्यान्ह मुहूर्त) | सकाळी ११:०१ ते दुपारी ०१:३८ पर्यंत |
गंगा सप्तमीचे आध्यात्मिक महत्त्व
१. पापमुक्ती: असे मानले जाते की या दिवशी गंगेत स्नान केल्याने मनुष्याचे दहा प्रकारचे पाप (कायिक, वाचिक आणि मानसिक) नष्ट होतात.
२. पितृदोष निवारण: या दिवशी पूर्वजांच्या नावाने तर्पण किंवा दान केल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि पूर्वजांना सद्गती प्राप्त होते.
३. मोक्ष प्राप्ती: गंगा ही 'मोक्षदायिनी' आहे. या दिवशी केलेली भक्ती व्यक्तीला जन्म-मरणाच्या फेऱ्यातून मुक्त करण्यास मदत करते.
हे ही वाचा : गुरुपुष्यामृत योग २०२६: केवळ सोने खरेदीच नाही, तर आयुष्याला सोन्याची झळाळी देणारा 'गुरुपुष्य' योग!
पुजा विधी: घरच्या घरी कशी करावी पूजा?
जर तुम्हाला गंगा नदीवर जाणे शक्य नसेल, तर तुम्ही खालीलप्रमाणे घरीच पूजा करू शकता:
गंगा स्नान: अंघोळीच्या पाण्यात थोडे 'गंगाजल' टाकून "गंगे च यमुने चैव..." या मंत्राचा जप करत स्नान करावे.
पूजा: देव्हाऱ्यात गंगाजलाच्या कलशाची किंवा माँ गंगेच्या प्रतिमेची स्थापना करावी. त्यांना अक्षता, फुले आणि चंदन अर्पण करावे.
दीपदान: संध्याकाळी वाहत्या पाण्यात किंवा घराबाहेर दिवा लावून दीपदान करावे.
मंत्र जप: "ॐ नमो गंगायै विश्वरूपिण्यै नारायण्यै नमो नमः" या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.
दान: या दिवशी सातू (जवस), गूळ किंवा अन्नाचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते.