पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होणार, मुलांना शाळेत पाठविण्यास पालकांची धाकधूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:30 AM2021-01-21T04:30:43+5:302021-01-21T04:30:43+5:30

बीड : येत्या २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होणार आहेत. नववी ते १२वीचे वर्ग सुरू असले ...

Schools from fifth to eighth will begin, with parents pushing to send their children to school | पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होणार, मुलांना शाळेत पाठविण्यास पालकांची धाकधूक

पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होणार, मुलांना शाळेत पाठविण्यास पालकांची धाकधूक

Next

बीड : येत्या २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होणार आहेत. नववी ते १२वीचे वर्ग सुरू असले तरी उपस्थितीचे प्रमाण वाढलेले नाही; तर दुसरीकडे कोरोनाचा धोका कायम आहे. अशा परिस्थितीत मुलांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांची धाकधूक सुरू आहे. काही पालकांनी स्पष्टपणे नकार दर्शविला; तर काही पालकांनी १० महिन्यांपासून घरात एकलकोंडे बनलेल्या मुलांना आकाश मोकळे व्हावे म्हणून शाळेत पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र बहुतांश पालक अजूनही संभ्रमात आहेत. मुलांचे लसीकरण करूनच शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घ्यायला हवा होता, असा सूरही पालकांमधून उमटला. मागील वर्षी मार्चपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय पुढे आला; परंतु कुठे मोबाईलच नसणे, तर कुठे तांत्रिक अडथळे आले. आता शाळा प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी शासन-प्रशासन प्रयत्न करीत आहेत. नववी ते १२वीचे वर्ग सुरू करण्याआधी शासनाने काेविड-१९ बाबत दक्षतेसाठी शाळांमध्ये निर्जंतुकीकरण, थर्मल गन, ऑक्सिमीटरद्वारे तपासणीचे निर्देश दिले होते. मात्र काही शाळांमध्ये काटेकोर, तर अनेक शाळांमध्ये पालनच होत नसल्याची स्थिती आहे. हे पाहून पालकांमध्ये धाकधूक आहे. मात्र परिस्थिती पूर्वपदावर येत असताना आता मात्र मुलांना शाळेत पाठविले पाहिजे, असे काही पालकांचे मत आहे.

नववी ते बारावी उपस्थितीचा आलेख वाढेना

नववी ते १२वीचे वर्ग सुरू झाल्यानंतर काही दिवस उपस्थिती कमी होती. मात्र त्यानंतर हे प्रमाण वाढले. एकूण उपस्थितीनुसार हे प्रमाण शहरी भागात ५५, तर ग्रामीण भागात ४५ टक्के राहिले. परंतु त्यापलीकडे उपस्थितीमध्ये वाढ होऊ शकली नाही. उलट काही ठिकाणी शिक्षक बाधित निघाले. ते बरे झाले असले तरी उपस्थितीवर परिणाम झालेला आहे. पालकांमधून कोरोनाचे भय अद्याप दूर झाले नसल्याचे चर्चेतून जाणवले.

जिल्ह्यातील विद्यार्थिसंख्या

पाचवी : ५३०२५

सहावी : ५१७४३

सातवी : ५१ २२८

आठवी : ४९५४०

जिल्ह्यातील शाळांची संख्या : १९९४

शिक्षकांची संख्या : ९०४३

पालकांना काय वाटते?

कोरोनाची परिस्थिती पाहता सध्या शाळा सुरू करणे चुकीचे आहे. शाळांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे तसेच कोविड- १९ च्या नियमांचे काटेकोर पालन होणार आहे का? कोण जबाबदारी घेणार? शाळेपेक्षा लेकरांचा जीव महत्त्वाचा आहे. मुलांना पाठवणार नाही.

- रोहिदास घोडके, पालक, बीड.

----

आठ-नऊ महिने ऑनलाईन शिक्षण झाले. आता ऑफलाईन झाले तर बरे होईल. कोरोनाचे वातावरण कमी झाले आहे. शाळा सुरू होणे आवश्यक आहे. शाळांनी काळजी घेत निर्जंतुकीकरण व नियमांचे पालन झाल्यास अडचणी येणार नाहीत. मुलांना शाळेत पाठवणार.

- शिवाजी परळकर, पालक

------------

मुलांना आकाश मोकळे हवे

घरी मुले मोबाईल, टीव्हीच्या आहारी गेली आहेत. एकलकोंडी बनत आहेत. त्यामुळे पालकही हैराण झाले आहेत. शाळेत मुले गेली तर अभ्यासाला लागतील. सामूहिक खेळ नसले तरी शारीरिक व मानसिकदृष्ट्या मोकळे होतील. मुलाला शाळेत पाठवणार आहे.

- मुरलीधर राऊत, पालक

----

पालकांनी टाळू नये

पालकांनी संमतीपत्र देऊन मुलांना शाळेत पाठवावे. मुले आजारी असतील तर पाठवू नये. मास्क, सॅनिटायझर सोबत द्यावे. डबा, पाण्याच्या बाटलीची अदलाबदल करू नये, शाळेत घोळका करू नये, अशा दक्षतेच्या सूचना कराव्यात. परिस्थिती नियमित व पूर्वपदावर येत आहे. परीक्षा जवळ आल्या आहेत. त्यामुळे पाल्यांना शाळेत पाठविण्याचे पालकांनी टाळू नये. शाळांनीही शासन निर्देशांचे पालन करून काळजी घ्यावी.

- श्रीकांत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी (प्रा.)

..........................

Web Title: Schools from fifth to eighth will begin, with parents pushing to send their children to school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.