माजलगावात गुरुवारी संकल्प निरोगी अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:22 IST2021-07-21T04:22:56+5:302021-07-21T04:22:56+5:30

माजलगाव : येथील ग्रामीण रुग्णालयात संकल्प निरोगी अभियान गुरुवार रोजी घेण्यात येणार आहे. यामध्ये अनेक कर्मचाऱ्यांची त्या त्या ...

Sankalp Nirogi Abhiyan on Thursday in Majalgaon | माजलगावात गुरुवारी संकल्प निरोगी अभियान

माजलगावात गुरुवारी संकल्प निरोगी अभियान

माजलगाव : येथील ग्रामीण रुग्णालयात संकल्प निरोगी अभियान गुरुवार रोजी घेण्यात येणार आहे. यामध्ये अनेक कर्मचाऱ्यांची त्या त्या कार्यालयात जाऊन तपासणी करण्यात येणार आहे. लहान मुलांना ऑनलाइनद्वारे कोविडविषयी माहिती दिली जाणार असल्याची माहिती डॉ. गजानन रुद्रवार व डॉ. मधुकर घुबडे यांनी दिली.

मागील एक वर्षापासून कोरोना काळात ज्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन आरोग्य विभागाला सहकार्य केले, त्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची तपासणी या शिबिराच्या माध्यमातून केली जाणार आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून शुगर व बीपी तपासला जाणार आहे. ज्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची तपासणी केली जाणार आहे, त्यात तहसील, पंचायत समिती, नगरपरिषद पोलीस स्टेशन व कोर्टाचा समावेश करण्यात आला आहे.

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना कोरोनाविषयी माहिती व्हावी म्हणून जा त्या शाळेत जाऊन आरोग्य कर्मचारी ऑनलाइनद्वारे विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येणार आहे व विद्यार्थ्यांच्या छोट्या छोट्या शस्त्रक्रियादेखील या शिबिरात होणार आहेत. ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबिराचेदेखील आयोजन करण्यात येणार आहे. ग्रामीण रुग्णालयात जे रुग्ण दाखल आहेत त्या रुग्णांच्या नातेवाइकांची तपासणीदेखील यावेळी करण्यात येणार आहे.

या शिबिरात गरोदर मातांना कोरोनाची लस देण्यास सुरुवात होईल. त्याचबरोबर न्युमोकोकल काॅन्ज्युगेट व्हॅक्सिन या नवीन लसीकरणाची सुरुवात करण्यात येणार असून ही लस लहान बालकांना देण्यात येणार आहे. या व्हॅक्सिनमुळे न्युमोकोकल आजारामुळे बाधित बालकांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येणार नाही व बालकांचा मृत्यूपासून बचावदेखील होणार असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक

डॉ. गजानन रुद्रवार यांनी दिली.

माजलगाव तालुक्यातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्रातदेखील गरोदर मातांचे लसीकरण व लहान बालकांना न्युमोकोकल काॅन्ज्युगेट व्हॅक्सिन देण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मधुकर घुबडे यांनी दिली.

Web Title: Sankalp Nirogi Abhiyan on Thursday in Majalgaon