मोबाईलचे लोकेशन ठरले 'गेमचेंजर'; परळीत फिरणाऱ्या चोरट्यांना रेल्वे पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 15:40 IST2026-01-03T15:40:39+5:302026-01-03T15:40:59+5:30
परळी रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई; ३ सराईत गुन्हेगार गजाआड

मोबाईलचे लोकेशन ठरले 'गेमचेंजर'; परळीत फिरणाऱ्या चोरट्यांना रेल्वे पोलिसांनी ठोकल्या बेड्या
परळी:रेल्वे प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू, मोबाईल आणि दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीचा परळी रेल्वे पोलिसांनी यशस्वीपणे पर्दाफाश केला आहे. डिसेंबर महिन्यात विविध एक्सप्रेस गाड्यांमध्ये झालेल्या चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत पोलिसांनी २ जानेवारी रोजी तीन सराईत चोरट्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून ३ लाख ६७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
लाईव्ह लोकेशन ठरले 'गेमचेंजर'
३१ डिसेंबर रोजी अमरावती–पुणे एक्सप्रेसमध्ये जिया हुल नासिर या बिहारच्या प्रवाशाची ७५,७०० रुपयांची बॅग चोरीला गेली होती. पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला असता, चोरीस गेलेल्या मोबाईलचे 'लाईव्ह लोकेशन' परळी शहरातच असल्याचे दिसून आले. पोलिसांनी सापळा रचून बाबासाहेब बोर्डे (जालना), गजानन कुसळे (हिंगोली) आणि संदीप घुले (जालना) या तिघांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्यांनी अमरावती-पुणेसह साईनगर शिर्डी आणि काकीनाडा एक्सप्रेसमधील चोऱ्यांचीही कबुली दिली.
मोठा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल हँडसेट आणि रोख रक्कम जप्त केली आहे. यामध्ये काकीनाडा एक्सप्रेसमधून चोरीला गेलेले पाचोरा येथील महिलेचे ३ तोळे सोन्याचे दागिनेही हस्तगत करण्यात आले आहेत. अटकेतील आरोपींमध्ये छ. संभाजीनगर, परभणी आणि नांदेड परिसरात वॉन्टेड असलेल्या एका गुन्हेगाराचा समावेश असल्याने रेल्वेतील चोऱ्यांच्या घटनांना मोठा आळा बसण्याची शक्यता आहे. ही कारवाई लोहमार्ग पोलीस अधीक्षक स्वाती भोर आणि उपविभागीय अधिकारी संजय लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघमोडे व त्यांच्या पथकाने पार पाडली.