कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 14:34 IST2025-10-02T14:31:16+5:302025-10-02T14:34:14+5:30
आज दसऱ्या निमित्त राज्यभरात राजकीय दसरा मेळावे होणार आहेत. नुकताच बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे मंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी मोठी गर्दी जमली होती.

कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
मंत्री पंकजा मुंडे यांनी आज बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे दसरा मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला मोठी गर्दी जमली होती. दसरा मेळाव्यात या वर्षी एक वादग्रस्त प्रसंग घडला. यामुळे चर्चांना चांगलेच उधाण आले. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचे पोस्टर काही तरुणांच्या हातात होते. या पोस्टरचे व्हिडीओ आणि फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या पोस्टरवर "We support walmik anna, कराड आमचे दैवत" असा मजकूर दिसत आहे.
या पोस्टरमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. कराडच्या समर्थकांनी हे पोस्टर झळकल्याची माहिती समोर आली आहे. यावरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली. मला हे ऐकून अतिशय धक्का बसला आहे. एक सुद्धा बॅनर झळकला असेल तर आपण सर्वांनी मान शरमेने खाली घालणे गरजेचे आहे. या राजकारणात आता इतकी विकृती आलेली आहे. लोकांच्या मानसिकतेत इतकी विकृती आली आहे. इतक्या खालच्या दर्जाची कृत्य करून सुद्धा या लोकांचे अशा पद्धतीचे बॅनर झळकत असतील तर पंकजा मुंडे यांना घेराव घालून हा याबाबत प्रश्न विचारला पाहिजे. यावर तुमचे म्हणणे काय?, असा सवाल दमानिया यांनी केला.
पंकजा मुंडेंना वैयक्तिकरित्या वाल्मीक कराड यांच्याबाबत काय वाटते? असे प्रश्न पंकजा मुंडे यांना विचारले पाहिजे, असंही दमानिया म्हणाल्या. धनंजय मुंडे यांना याबाबत विचारून काही फायदा नाही, कारण ती गॉन केस आहे, अशी टीकाही दमानिया यांनी केली.