...तर अधिक आनंद झाला असता; बीडचं पालकमंत्रिपद अजित पवारांना गेल्यानंतर पंकजा मुंडेंची खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 10:14 IST2025-01-20T09:48:04+5:302025-01-20T10:14:06+5:30
मी बीडची लेक असल्याने बीडचं पालकमंत्रिपद मिळालं असतं तर अधिक आनंद झाला असता, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

...तर अधिक आनंद झाला असता; बीडचं पालकमंत्रिपद अजित पवारांना गेल्यानंतर पंकजा मुंडेंची खंत
BJP Pankaja Munde: मंत्रिमंडळ विस्ताराच्या महिनाभरानंतर अखेर राज्यात पालकमंत्र्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र पालकमंत्रिपदाबाबतच्या निर्णयानंतर महायुतीत धुसपूस वाढीस लागली असून काही नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी आपण नाराज नसल्याचं सांगितलं असलं तरी आपल्या मनातील खंतही बोलून दाखवली आहे. मी बीडची लेक असल्याने बीडचं पालकमंत्रिपद मिळालं असतं तर अधिक आनंद झाला असता, असं त्यांनी म्हटलं आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, "मला जालन्याचं पालकमंत्रिपद मिळालं आहे. प्रचंड प्रतिसाद मला तिथून येत आहे. मला एखादी संधी मिळते तेव्हा मी एक अनुभव म्हणून त्याकडे पाहत असते. प्रत्येक वेळी तुम्हाला सेम काम करायला मिळतं, असं नाही. जसं मी ५ वर्षे कोणत्याही संवैधानिक पदावर नसताना संघटनेचं काम केलं. मी बीडची लेक आहे, बीडची सेवा करण्यासाठी संधी मिळाली असती तर अधिक आनंद झाला असता, बीडकरांनाही आनंद झाला असता," अशा शब्दांत पंकजा मुंडेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, " माझा पाच वर्षांचा पालकमंत्रिपदाचा कार्यकाळ बीडच्या इतिहासातील सर्वांत विकसनशील काळ होता, हे कोणीही नाकारू शकत नाही. आता पालकमंत्रिपदाबाबत जो निर्णय झाला आहे, त्याबाबत असहमती न दर्शवता जास्तीत जास्त चांगलं काम करण्याच्या भूमिकेत मी आहे," असंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे.
धनंजय मुंडेंना धक्का
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे राज्यातील राजकारण तापले. या हत्येचा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराडवर असल्यामुळे, विरोधक सातत्याने मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. तसेच, बीडमधील मराठा समाजाचाही धनंजय मुंडेंच्या नावाला विरोध होता. अशा परिस्थितीमध्ये मुंडेंना बीडचे पालकमंत्रिपद मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता अखेर यादी आली अन् त्यातून मुंडेंचे नाव वगळण्यात आले आहे. विशेष म्हणजे, धनंजय मुंडेंना फक्त बीडच नाही, तर कुठल्याच जिल्ह्याचे पालकमंत्री करण्यात आले नाही.