भोंडवे कुटुंबातील चौघांवर अंत्यसंस्कार; बचावलेल्या अश्विनच्या संवादाने जनसमुदाय हळहळला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 11:43 AM2023-02-23T11:43:29+5:302023-02-23T13:10:13+5:30

समाजसेवक सुदाम भोंडवेसह कुटुंबातील चौघांवर गुरुकुल परिसरात शाेकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Four of the Bhondve family cremated simultaneously at Patoda; Ashwin's dialogue on the rescue sent the crowd into a frenzy | भोंडवे कुटुंबातील चौघांवर अंत्यसंस्कार; बचावलेल्या अश्विनच्या संवादाने जनसमुदाय हळहळला

भोंडवे कुटुंबातील चौघांवर अंत्यसंस्कार; बचावलेल्या अश्विनच्या संवादाने जनसमुदाय हळहळला

googlenewsNext

पाटोदा (बीड) : नगर पुणे महामार्गावर शिरूर घोडनदी तालुक्यातील कारेगावजवळ झालेल्या अपघातात मृत्यू झालेले सुदाम भोंडवेसह कुटुंबातील चौघांवर बुधवारी गुरुकुल परिसरात शाेकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी जनसमुदायासमोर अश्विन भोंडवे भावना व्यक्त करताना उपस्थित सर्वच हळहळले. संपूर्ण परिसर काही वेळ स्तब्ध झाला होता.

मंगळवारी अपघात झाल्यानंतर सुदाम भोंडवे, पत्नी सिंधुताई भोंडवे, सून कार्तिकी भोंडवे, नात आनंदी भोंडवे यांचे पार्थिव बुधवारी डोमरी येथे गुरुकुल परिसरात आणण्यात आले. गुरुकुलासमोर अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवले हाेते. त्यानंतर अंत्यसंस्कार झाले. या वेळी सोनदरा गुरुकुलचे विद्यार्थी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी, माजी आमदार भीमराव धोंडे, सागर धस, दत्ता बारगजे तसेच जिल्हा व अन्य ठिकाणाहून आलेल्या शेकडो नागरिकांनी साश्रू नयनांनी भोंडवे कुटुंबातील चौघांना अखेरचा निराेप दिला.

काकांनी दोन गोष्टी दिल्या.. प्रेम आणि खरेपणा
सुदामकाकांनी सुरू केलेले हे कार्य आपल्या सर्वांच्या सहकार्याने पुढे अविरत सुरू ठेवले जाईल. काकांनी दोन गोष्टी दिल्या प्रेम, आणि खरेपणा. काकांनी दिलेली ही दोन मूल्ये आपण आत्मसात करून त्यांचे कार्य पुढे नेऊ, असा विश्वास अश्विन भोंडवे यांनी या वेळी दिला. त्यांचा संवाद ऐकताना प्रत्येक जण गहिवरला होता.

काकांचे कार्य भारतासह विदेशातही परिचित
सुदामकाकांनी गुरूकुलचे रोपटे लावले. त्याचे वटवृक्ष झाले. त्यांचे कार्य महाराष्ट्राबाहेरच नव्हे तर देशाबाहेर पण परिचित आहे. त्यांचे कार्य विसरण्याजोगे नाही. त्यांनी महान कार्य केल्याची स्मृती कायम राहील. - दत्ता बारगजे, सामजिक कार्यकर्ते.

दु:खाचा डोंगर कोसळला.
भोंडवे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या दु:खात धीर देण्यासाठी आपण सर्वजण त्यांच्या सोबत आहोत. गुरुकुल परिवारास आम्ही नेहमी साहाय्य करत राहू. - भीमराव धोंडे, माजी आमदार.

Web Title: Four of the Bhondve family cremated simultaneously at Patoda; Ashwin's dialogue on the rescue sent the crowd into a frenzy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.