'बालपणीचं भांडण, तारुण्यात खून करून सूड!'; बीडमधील हत्याकांडाचे धक्कादायक कारण उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 14:51 IST2026-01-14T14:50:58+5:302026-01-14T14:51:21+5:30
बीडमध्ये बालपणीच्या वादातून 'कंत्राटी' मजुराचा खून; पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासा

'बालपणीचं भांडण, तारुण्यात खून करून सूड!'; बीडमधील हत्याकांडाचे धक्कादायक कारण उघड
बीड : जिल्हा न्यायालयाने खून प्रकरणातील आरोपी विशाल सूर्यवंशी यास चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. आरोपीच्या चौकशी दरम्यान त्याने लहानपणी झालेल्या भांडणावरून हर्षद शिंदे याचा खून केला असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना सांगितली. यामुळे पोलिसही चक्रावून गेले. अशा किरकोळ घटनांवरून खून होत असेल तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आणखीनच बिकट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बीड शहरातील शहरातील अंकुशनगर भागात नगरपालिकेच्या पाइपलाइनचे काम करणारा कंत्राटी मजूर हर्षद शिंदे याचा गोळ्या झाडून कोयत्याने तोंडावर वार करीत निर्घृण खून केल्याची घटना ६ जानेवारी रोजी दुपारी घडली होती. आरोपी विशाल यास पोलिसांनी धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातून केजकडे दुचाकीवरून येत असताना रविवारी रात्री अटक केली होती. सोमवारी न्यायालयात हजर केले असता जिल्हा न्यायालयाने आरोपीस चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. हर्षद शिंदे व आरोपी विशाल सूर्यवंशी हे एकमेकांच्या परिचयाचे होते. लहानपणी झालेल्या भांडणावरून खून केला असल्याचे आरोपीने पोलिसांना चौकशी दरम्यान सांगितले.
क्षुल्लक कारणावरून खून
आरोपीने क्षुल्लक कारणावरून खून केल्याचे चौकशीत समोर आले आहे. अशाप्रकारे जर किरकोळ कारणावरून खून होत असतील तर तरुणांची मानसिकता का बिघडत चालली आहे, याचे कारण शोधणे आवश्यक आहे.
- प्रवीणकुमार बांगर, पोलिस निरीक्षक, शिवाजीनगर, बीड