मोठी बातमी! अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीने उडवले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 11:54 IST2025-11-25T11:50:17+5:302025-11-25T11:54:43+5:30
या हृदयद्रावक घटनेने ताफ्यातील वाहनांच्या वेग आणि सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

मोठी बातमी! अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीने उडवले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू
धारूर ( बीड) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील अग्निशामक दलाच्या गाडीने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या कुसुम विष्णु सुदे (वय ३०) यांनी अखेर आज, मंगळवारी ( दि. २५ ) उपचारादरम्यान प्राण गमावले. यामुळे सुदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (ता.२२) रोजी परतूरहून औसा येथे प्रचारसभेसाठी जात असताना तेलगाव–धारूर महामार्गावरील धूनकवड फाटा येथे ही दुर्घटना घडली होती. यात सुदे पती-पत्नी आणि त्यांच्या दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत.
ताफ्यातील वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत कुसुम सुदे, त्यांचे पती विष्णु दामोदर सुदे (३५) आणि दोन लहान मुली रागिणी (९) व अक्षरा (६) गंभीर जखमी झाले होते. झालेला अपघात इतका भीषण होता की दुचाकी संपूर्ण उद्ध्वस्त झाली आणि चारही जण रस्त्यावर फेकले गेले. तातडीने स्थानिकांनी तत्परता दाखवत जखमींना धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तत्काळ लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. कुसुम सुदे यांची स्थिती अत्यंत नाजूक होती. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु गंभीर दुखापतींमुळे उपचार सुरू असतानाच त्यांची आज, मंगळवारी सकाळी प्राणज्योत मावळली. त्यांच्या निधनाने सुदे कुटुंबात तसेच संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
दोन निष्पाप मुलींसह संपूर्ण कुटुंब एका क्षणात उद्ध्वस्त झाल्याने स्थानिक नागरिकांनी या अपघाताची चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, जखमी विष्णु सुदे व दोन्ही मुलींवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी अशी प्राथना व्यक्त केली जात आहे. या हृदयद्रावक घटनेने ताफ्यातील वाहनांच्या वेग आणि सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे केले आहे.