Beed: खानापूर शिवारात वृद्धेच्या डोक्यात काठी मारून अंगावरील सोने ओरबडले; आरोपी फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 13:59 IST2026-04-29T13:57:07+5:302026-04-29T13:59:09+5:30
आष्टी पोलिसांसमोर गुन्हेगारांचे आव्हान! एका महिन्यात चोभानिमगावसह ३ ठिकाणी महिलांना लक्ष्य केल्याने खळबळ.

Beed: खानापूर शिवारात वृद्धेच्या डोक्यात काठी मारून अंगावरील सोने ओरबडले; आरोपी फरार
- नितीन कांबळे
कडा (ता. आष्टी): आष्टी तालुक्यातील खानापूर शिवारात मंगळवारी (२८ एप्रिल) दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास एका अज्ञात हल्लेखोराने वृद्ध महिलेवर काठीने हल्ला करून अंगावरील सोन्याचे दागिने लुटल्याची घटना घडली आहे. छायाबाई संदीप तावरे असे जखमी महिलेचे नाव असून, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर सध्या अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हल्लेखोराने चेहरा बांधून केला वार
मिळालेल्या माहितीनुसार, छायाबाई आपल्या शेतात असताना एका तोंडाला रुमाल बांधलेल्या इसमाने अचानक त्यांच्यावर काठीने हल्ला केला. डोक्यावर जोरदार प्रहार केल्याने त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या, त्यानंतर आरोपीने त्यांच्या अंगावरील दागिने ओरबडून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार प्रवीण क्षिरसागर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे.
एका महिन्यात तीन महिलांची लूट
आष्टी तालुक्यात गेल्या महिनाभरात लूटमारीच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. १ एप्रिल रोजी चोभानिमगाव येथे शेतकरी महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता, तर १६ एप्रिल रोजी दुचाकीवरील दोघांनी एका महिलेचे १२ ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावले होते. या सलग घडणाऱ्या घटनांमुळे शेतात काम करणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी केली जात आहे.