मंजूर पीकविमा द्यावा अन्यथा आंदोलन छेडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:41 IST2021-07-07T04:41:34+5:302021-07-07T04:41:34+5:30

वडवणी : मागील वर्षी खरीप हंगामात पिकांचे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. खरीप हंगामात २०२०-२१ मध्ये ...

Approved crop insurance should be given otherwise agitation will break out | मंजूर पीकविमा द्यावा अन्यथा आंदोलन छेडणार

मंजूर पीकविमा द्यावा अन्यथा आंदोलन छेडणार

वडवणी : मागील वर्षी खरीप हंगामात पिकांचे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. खरीप हंगामात २०२०-२१ मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. सदर नुकसानीचे पंचनामे तालुका कृषी व तालुका महसूल विभाग यांनी नुकसानीचे पंचनामे करून, वरिष्ठ कार्यालयाच्या माध्यमातून शासनास दिले. तरीदेखील गतवर्षी पीकविमा नुकसान भरपाई देण्यात आली नाही.

मागील पीक विम्याचीच प्रतीक्षा असल्याने आता नवीन पीक विमा काढावा की नाही? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे सिद्ध झाले आहे. त्यानुसार तत्कालीन हंगामातील आणेवारी ही घसरलेली होती. या सर्व बाबी पीक विमा मंजूर होण्यासाठी पुरेशा आहेत. तरीसुद्धा वडवणी तालुक्यातील वडवणी व कवडगाव महसूल मंडळात अद्याप पीक विमा मिळालेला नाही. याकरिता चिंचोटी गावातील व परिसरातील शेतकऱ्यांनी ५ जुलै रोजी तहसीलदार यांना निवेदन दिले. शेतकऱ्यांना दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागत असल्याने नुकसानीचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीपासून दिलासा मिळावा, याकरिता शासनाने प्रधानमंत्री पीकविमा योजना अंमलात आणली. पीकविमा योजनेने कंपन्या मालामाल होत असून, शेतकरी कंगाल होत असल्याचे चित्र आहे. तालुक्यात कपाशी, सोयाबीन व तूर या पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. दरवर्षी शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागतो. त्यामुळे निसर्गकोपाच्या संकटात भरडणाऱ्या शेतकऱ्यांनी आर्थिक कोेंडीतून सावरण्याकरिता प्रधानमंत्री पीक विमा योजनेला पसंती दिली. मागील वर्षातील पीकविमा न दिल्यास आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शेतकरी धनपाल गोंडे, महादेव गोंडे, सुमंत गोंडेसह शेतकरी यांनी दिला आहे.

Web Title: Approved crop insurance should be given otherwise agitation will break out