एसटी प्रवाशांना स्वच्छतागृहे आता मोफत वापरता येणार ! बस स्थानकांचा होणार कायापालट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 16:53 IST2026-05-12T16:52:27+5:302026-05-12T16:53:12+5:30
Amravati : एसटी स्थानकांवरील अस्वच्छता आणि स्वच्छतागृहांच्या दुरवस्थेबाबत प्रवाशांच्या नेहमीच तक्रारी असायच्या. मात्र, आता एसटी महामंडळाने यावर मोठा निर्णय घेतला आहे.

ST passengers can now use toilets for free! Bus stations will be transformed
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : एसटी स्थानकांवरील अस्वच्छता आणि स्वच्छतागृहांच्या दुरवस्थेबाबत प्रवाशांच्या नेहमीच तक्रारी असायच्या. मात्र, आता एसटी महामंडळाने यावर मोठा निर्णय घेतला आहे. १ जूनपासून राज्यातील सर्व एसटी स्थानकांतील स्वच्छतागृहे प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत होणार आहेत. यासाठी प्रवाशांच्या तिकिटावर आकारल्या जाणाऱ्या स्वच्छता अधिभाराचा मोबदला आता प्रत्यक्ष सोयींच्या स्वरूपात मिळणार आहे.
एसटी स्थानकांसह स्वच्छतागृहांचा दर्जा सुधारण्यासाठी महामंडळाने १५ एप्रिलपासून 'स्वच्छता अधिभार' लागू केला आहे. यामध्ये प्रत्येक प्रवाशाच्या तिकिटावर २ रुपये जादा आकारले जात आहेत. या जमा होणाऱ्या निधीतूनच स्थानकांच्या स्वच्छतेचा खर्च भागवला जाणार आहे. आजवर एसटी स्थानकांवरील स्वच्छतागृहे ही खासगी कंत्राटदारांमार्फत चालवली जात होती. मात्र, अनेक ठिकाणी कंत्राटदार मनमानी शुल्क आकारत असल्याच्या आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी होत्या. आता महामंडळ हे कंत्राट रद्द केला आहे.
असे आकारले जाते शुल्क
सध्या प्रवाशांना एसटी स्थानकांवरील स्वच्छतागृहे वापरण्यासाठी ५ रुपये ते १० रुपयांपर्यंत शुल्क मोजावे लागते. अनेकदा सुट्या पैशांवरून कंत्राटावरील कर्मचाऱ्यांशी प्रवाशांचे खटके उडतात.
सध्या कोणाकडे आहे स्वच्छतेची जबाबदारी ?
सध्या बहुतेक बसस्थानकांवरील स्वच्छतागृहांचे संचालन 'पे अँड युज' तत्त्वावर खासगी कंत्राटदारांकडे आहे. कंत्राटदारांकडून स्वच्छतेचे नियम पाळले जात नसल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसते. प्रति प्रवासी दोन रुपये स्वच्छता अधिभार आकारला जात आहे.
कँटीनमध्ये ३० रुपयांत मिळणार चहा-नाश्ता
प्रवाशांना स्वस्त दरात आहार मिळावा यासाठी महामंडळाने कँटीन धोरणातही बदल केला आहे. आता बसस्थानकांवरील कँटीनमध्ये केवळ ३० रुपयांत चहा आणि नाश्ता उपलब्ध करून दिला जाणार आहे.
१ जूनपासून वापरा निःशुल्क स्वच्छतागृह
१ जूनपासून प्रवाशांना कोणत्याही एसटी स्थानकावर लघुशंका, स्वच्छतेसाठी वेगळे पैसे देण्याची गरज राहणार नाही. तिकिटावर आधीच २ रुपये अधिभार दिला असल्याने, स्वच्छतागृहांचा वापर प्रवाशांसाठी पूर्णपणे निःशुल्क असेल.
चालक-वाहकांसाठी अत्याधुनिक विश्रांतीगृहे
केवळ प्रवासीच नव्हे, तर एसटीचा कणा असलेल्या चालक आणि वाहकांसाठीही महामंडळ सुधारणा करत आहे. चालक-वाहकांची विश्रांतीगृहे दुरवस्थेत आहेत. आता त्यांच्यासाठी टीव्ही, वातानुकूलित यंत्रणा, चांगल्या बेडसह अत्याधुनिक विश्रांतीगृहे उभारली जाणार आहेत.