परतवाडा व्हिडिओ कांड : 'मुलींना जाळ्यात कसे ओढायचे हे मी गुरूकडून शिकलो' अयानने दिली कबुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 19:32 IST2026-04-20T19:30:08+5:302026-04-20T19:32:14+5:30
Amravati : सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या अयान अहमद नावाच्या नराधमाचा खरा चेहरा आता समोर आला आहे.

'I learned how to lure girls into a trap from my guru', Ayan confessed
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या अयान अहमद नावाच्या नराधमाचा खरा चेहरा आता समोर आला आहे. त्याच्यासह अन्य अटक आरोपींकडून १८ अश्लील व्हिडिओ आणि ३९ फोटोग्राफ्स पोलिसांनी जप्त केले असले तरी या नराधमाला आपल्या कृत्याची साधी 'खंत'देखील नसल्याची धक्कादायक बाब पोलिस तपासात समोर आली आहे. एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे अयान एसआयटी समोर वागत असून, त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाऐवजी निर्लज्जपणा स्पष्टपणे दिसून येत आहे.
सहा दिवसांपासून एसआयटीची चमू नराधम अयानची कसून चौकशी करत आहेत. मात्र, या चौकशीत त्याने दिलेली माहिती अंगावर काटा आणणारी आहे. मुलींशी संवाद कसा साधायचा आणि त्यांना जाळ्यात कसे ओढायचे, हे मी एका विशिष्ट गुरूकडून शिकलो, अशी कबुली त्याने दिली आहे.
साथीदारांचेही फुटले बिंग
या गुन्ह्यात अयानला साथ देणारा मानव सुगंधे आणि अयानचे व्हिडीओ चोरणारा उजेर खान यांना समोरासमोर बसवून पोलिसांनी त्यांची 'खाकी' स्टाइलने उलटतपासणी केली. तासाभरासाठी भाड्याने फ्लॅट उपलब्ध करून देणाऱ्या मानव सुगंधेच्या मदतीने अयानने हे पाशवी कृत्य केले. पोलिसांनी आतापर्यंत मोबाइल, लॅपटॉप आणि हार्ड डिस्क जप्त केली असून, तांत्रिक पुराव्यांचे जाळे अयानभोवती घट्ट विणले आहे.
'तो मी नव्हेच' चा अयानचा सूर, पिडिताने काढली हवा
विशेष म्हणजे, केवळ आठ मुलीच नव्हे तर अनेक मुली आपल्या संपर्कात होत्या आणि अमरावतीतील कठोरा नाक्यावरील फ्लॅटमध्ये जे घडले ते 'संमतीने' होते, असा दावा करून तो स्वतःचा बचाव करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. मात्र, एक १५ वर्षीय मुलगी जबाबासाठी समोर आल्याने त्याच्या दाव्यातील हवा निघाली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात पोलिसांनी स्ट्रॉग 'से' दाखल केल्याने आरोपी अयान अहमद याला न्यायालयाने तब्बल सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. आता पिडिताच्या बयानावर अयानचे पुढील भवितव्य अवलंबून असेल.
असे आहे एसआयटीचे निरीक्षण
इतका मोठा गुन्हा करूनही त्याच्या डोळ्यांत साधी शरम नाही. उलट तो अतिशय शांतपणे पोलिसांच्या प्रश्नांना उत्तरे देत आहे. ही एक विकृत मानसिकता असून, अशा गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा मिळणे गरजेचे आहे. त्यादृष्टीनेच ही केस अधिक स्ट्राँग कशी होईल, याकडे एसआयटीने लक्ष केंद्रित केले आहे. अशोक खरात प्रकरणाची आठवण करून देणाऱ्या या घटनेने संपूर्ण राज्य हादरले असून, आता कायद्याचा बडगा या नराधमावर कसा पडतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
अमरावतीकरांचे लक्ष न्यायालयाकडे
मंगळवार, दि. २१ एप्रिल रोजी अयानची पोलिस कोठडी संपत आहे. या काळात त्याच्यावर आणखी नवीन गुन्हा दाखल होणार का, की मूळ गुन्ह्यातच कलमांची वाढ होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सोशल मीडिया ब्लॉगर म्हणून मिरवणाऱ्या या तरुणाला मुलींना जाळ्यात ओढण्याची जणू 'लत' लागली होती. मुलींशी शारीरिक जवळीक साधत असताना तो स्वतःच हाती मोबाइल घेऊन वा सेल्फी मोडवर स्वतःच व्हिडीओ रेकॉर्डिंग करीत होता, असेदेखील तपासादरम्यान उघड झाले आहे.