लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा (अमरावती): नात्यांच्या गाठी आणि संसाराची स्वप्ने एका क्षणात विखुरली गेली. आठ दिवस माहेरी राहून आनंदाने आपल्या गावी परतणाऱ्या पती-पत्नीचा रस्ते अपघातात दुर्दैवी अंत झाला. अमरावती-बडनेरा एक्स्प्रेस हायवेवरील वडुरा कटिंग पॉइंट येथे गुरुवारी रात्री पावणे आठच्या सुमारास एका भरधाव ट्रॅव्हल्सने दुचाकीला चिरडले. या भीषण अपघातात नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पाळा येथील कोठार नवदाम्पत्याचा मृत्यू झाला असून, या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दोन ते तीन महिन्यांपूर्वीच ते विवाहवेदीवर चढले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, पाळा येथील रहिवासी पुरण कौशल कोठार (२९) हे पत्नी वैष्णवी पुरण कोठार (२७) हिच्यासह तिच्या माहेरी वलगाव येथे गेले होते. आठ दिवस माहेरचा पाहुणचार घेऊन ते गुरुवारी रात्री दुचाकीने (एमएच २७, सीएक्स ४४८०) आपल्या घराकडे परतत होते. मात्र, वडुरा कटिंगजवळ काळाने त्यांच्यावर झडप घातली. अमरावतीकडून येणाऱ्या भरधाव ट्रॅव्हल्सने (एमएच ३७, डब्ल्यू ८१११) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, हे दाम्पत्य रस्त्यावर दूरवर फेकले गेले. ५० फूट फरपटत गेल्याने ते घटनास्थळीच ते अर्धमेले झाले.
उपाययोजना करा; नागरिकांच्या संतप्त भावना
या अपघातामुळे वडुरा पुलावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुलाचा उतार आणि वडुरा वस्तीकडे जाणारे वळण यामुळे येथे अनेकदा भीषण अपघात घडले आहेत.
दुचाकीस्वारांना येथून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो, अशा संतप्त भावना नागरिक व्यक्त करत आहेत. भविष्यातील जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासनाने येथे तातडीने गतिरोधक किंवा सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली
- अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. स्थानिकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून दोघांनाही जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि रक्तस्राव मोठ्या प्रमाणावर झाला होता. मात्र, डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही उपचारादरम्यान थोड्याच अंतराने दोघांचाही मृत्यू झाला.
- शुक्रवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. बडनेरा पोलिसांनी या प्रकरणी ट्रॅव्हल्सचालक शेख अलीम शेख रहीम (२७, रा. दिग्रस) याला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
Web Summary : A newlywed couple died in a road accident near Badnera after a speeding travels hit their motorcycle. Purણ Kothar (29) and Vaishnavi (27) were returning from her parents' home when the accident occurred. Locals demand safety measures on the dangerous Vadura bridge.
Web Summary : बडनेरा के पास एक सड़क दुर्घटना में एक नवविवाहित जोड़े की मौत हो गई, जब एक तेज रफ्तार ट्रैवल ने उनकी मोटरसाइकिल को टक्कर मार दी। पुरण कोठार (29) और वैष्णवी (27) अपने माता-पिता के घर से लौट रहे थे, तभी यह दुर्घटना हुई। स्थानीय लोग खतरनाक वदुरा पुल पर सुरक्षा उपायों की मांग कर रहे हैं।