लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : यंदा जानेवारी महिन्यात थाटामाटात निकाह झाला आणि मे महिन्यात अवघ्या १९ वर्षीय नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला. नागपुरातून मृतदेह आणून तिचा माहेरी अमरावतीत दफनविधी झाला. सासरच्या मंडळींनी 'हार्ट अटॅक' सांगून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. मात्र, माहेरच्या मंडळींच्या सतर्कतेमुळे अखेर १७ मे रोजी दफन मृतदेह कबरीतून बाहेर काढून त्याचे शवविच्छेदन करण्यात आले.
या घटनाक्रमाने अमरावती आणि नागपुरात एकच खळबळ उडाली आहे. फाजिला जबीन (१९) असे मृताचे नाव आहे. अमरावतीच्या सौदागरपुरा येथे माहेर असलेल्या फाजिलाचा निकाह नागपूर येथील एका तरुणाशी झाला होता. १५ मे रोजी पहाटे तिच्या सासरहून फोन आला. फाजिलाचा मृत्यू झाला आहे, तुम्ही तातडीने नागपूरला या, अशी माहिती देण्यात आली. तिला हृदयविकाराचा झटका आल्याचे सासरी सांगितले गेले. माहेरच्या मंडळींनी तातडीने नागपूर गाठले. सासरच्या वागणुकीवर आणि बोलण्यावर संशय आल्याने त्यांनी मुलीचा अंत्यविधी आम्ही आमच्या गावीच करू, असे सांगून फाजिलाचा मृतदेह अमरावतीत आणला. विशेष म्हणजे, नागपुरातून मृतदेह आणताना कोणत्याही रुग्णालयात किंवा पोलिस ठाण्यात या मृत्यूची नोंद करण्यात आलेली नव्हती.
गळ्यावरील 'त्या' व्रणाने संशय बळावला
१५ मे रोजी अमरावतीच्या हैदरपुरास्थित कब्रस्तानमध्ये फाजिलाचा दफनविधी झाला. त्यावेळी मुलीच्या गळ्यावर काही व्रण असल्याचे नातेवाइकांच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर हा घातपाताचा प्रकार असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला.
पोलिस ठाण्यात धाव
नातेवाइकांनी १६ मे रोजी सायंकाळी थेट नागपुरी गेट पोलिस ठाणे गाठले आणि सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून ठाणेदार हनुमंत उरलागोंडावार यांनी मृतदेह कबरीतून बाहेर काढण्याची उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली. ती मिळताच रविवारी सायंकाळीच शासकीय रुग्णालयात त्याचे इन-कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले.
Web Summary : A 19-year-old newlywed's suspicious death, initially ruled a heart attack by her in-laws, led to an exhumation and autopsy after her family suspected foul play due to marks on her neck. Police are investigating.
Web Summary : एक 19 वर्षीय नवविवाहिता की संदिग्ध मौत, जिसे शुरू में ससुराल वालों ने दिल का दौरा बताया, के बाद परिवार ने गले पर निशान देखकर संदेह जताया और शव को कब्र से निकालकर पोस्टमार्टम कराया गया। पुलिस जांच कर रही है।