आशादीप अनाथालय थाटणार अनाथ राणीचा संसार

By Admin | Updated: May 13, 2014 23:08 IST2014-05-13T23:08:16+5:302014-05-13T23:08:16+5:30

समाजातील अनाथ व अपंगांना जगण्याचं बळ देता यावं यासाठी सत्यशोधक बहुउद्देशीय शिक्षण संस्थेची तालुक्यातील टोंगलापूर-मासोद येथे स्थापना झाली.

Ashadeep orphanage will be the orphan Queen's world | आशादीप अनाथालय थाटणार अनाथ राणीचा संसार

आशादीप अनाथालय थाटणार अनाथ राणीचा संसार

सुरेश सवळे - चांदूरबाजार

समाजातील अनाथ व अपंगांना जगण्याचं बळ देता यावं यासाठी सत्यशोधक बहुउद्देशीय शिक्षण संस्थेची तालुक्यातील टोंगलापूर-मासोद येथे स्थापना झाली. यात आ. बच्चू कडू व नयना कडू या दाम्पत्यांनी समाजातील विविध घटकांतील ५५ अनाथ बालकांना दत्तक घेतले. यात आशादीप या अनाथालयाचा वेगळा विभाग उभारून त्यात समाजातील अनाथ बालकांचे संगोपन व त्यांना भावी जीवनात संसार थाटण्याची संकल्पना साकारण्यात आली. त्याची फलश्रृती १६ मे रोजी समाजासमोर पहिल्यांदाच येणार आहे.

राणी भटकर हिला या अनाथ व अपंग केंद्रात वयाच्या १२ व्या वर्षी दत्तक घेण्यात आले. राणीचे संगोपन व शिक्षण तब्बल सहा वर्षे करून तिचे भावी जीवन सुखकर व्हावे म्हणून तिचा संसार थाटण्यासाठी या केंद्राद्वारे प्रयत्न करण्यात आले.

बोरगाव मोहना येथील शेतकरी कुटुंबातील सुनील बोदुडे यांच्याशी राणीचा विवाह जुळला आहे. राणी व सुनीलला विवाह बंधनात बांधण्याकरिता १६ मे ही तारीख ठरली आहे. ज्या चिमुकल्यांना आयुष्यातील आई-बाबाचं मायेचं छत्र हरवलं त्या मायेची ऊब देता यावी, सृजनशील व्यक्तित्व घडविण्यासाठी त्यांना दिशा देण्यात यावी या हेतूने सहा वर्षांपासून समाजातील अनाथ व अपंग बालकांना या संस्थेत सामावून घेण्याचे कार्य सुरू असल्याचे या संस्थेच्या संचालिका नयना कडू यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

या केंद्राच्या आशादीप अनाथालय विभागातर्फे राणी व सुनील यांचा विवाह सोहळा आशादीप परिवाराकडून पूर्णामाय अपंग-अनाथ पुनर्वसन केंद्र, सत्यशोधन बहुउद्देशीय संस्था टोंगलापूर-मासोद येथे १६ मे रोजी सकाळी ११ वाजता संपन्न होणार आहे.

या संपूर्ण सोहळ्याचा खर्च आशादीप परिवारातर्फे लोकसहभागातून होणार आहे. समाजातील सर्व घटकांनी हजेरी लावण्याचे आवाहन नयना कडू व बच्चू कडू या दाम्पत्यांनी केले आहे.

Web Title: Ashadeep orphanage will be the orphan Queen's world