दुभाजकांवरील रोपे सुकण्याच्या मार्गावरअमरावती

By Admin | Updated: May 9, 2014 23:51 IST2014-05-09T23:51:49+5:302014-05-09T23:51:49+5:30

सौंदर्यीकरणाच्या नावावर लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

Amuavati on the way to dry seedlings on divisions | दुभाजकांवरील रोपे सुकण्याच्या मार्गावरअमरावती

दुभाजकांवरील रोपे सुकण्याच्या मार्गावरअमरावती

सौंदर्यीकरणाच्या नावावर लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला, असे म्हणण्याची वेळ आली आहे. शहरातील विविध दुभाजकांवरील रोपटी नियमित पाणी व योग्य देखभालीअभावी सुकण्याच्या मार्गावर आहेत. शहराच्या विकासाबरोबरच शहर सौंदर्यीकरणासाठी वृक्षारोपण केले जात आहे; मात्र, संवर्धनाकडे दुर्लक्ष झाल्याने वृक्षारोपण उपक्रमाचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. शहरातील मार्ग सुधारण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेकडे आहे. रस्तेबांधणी झाल्यावर दुभाजकावर रोपटे लावण्याचे कार्य दोन्ही विभागांद्वारे केले जाते. मात्र, झाडे लावल्यानंतर ती जगवली जात नाहीत. त्यामुळे वृक्ष संगोपनाचा बोजवारा उडाल्याचे दिसते. गेल्या कित्येक दिवसांपासून अमरावतीकर नागरिक हा प्रत्यक्ष अनुभव घेत आहेत. अमरावती-बडनेरा मार्गावर दिवसरात्र वाहतुकीची वर्दळ असते. नागरिक कामानिमित्त सतत ये-जा करतात. सर्वाधिक वर्दळीच्या या मार्गावरील सौंदर्यीकरणाचे तीनतेरा वाजले आहेत. महापालिकेच्या अख्त्यारित येणारा हा मार्ग भकास झाला आहे. मार्गावर ठिकठिकाणी कचरा व घाण साचली आहे. दुभाजकांची अवस्था देखील अत्यंत वाईट आहे. महापालिका आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडत नसल्याचे दिसून येत. दुभाजकांमध्ये लावलेली झाडे सुकून गेली आहेत. या झाडांना नियमित पाणी मिळत नाही. संगोपनाकडेही दुर्लक्ष केले जाते. महापालिकेने ज्या कंत्राटदारांना या रोपट्यांना पाणी देण्याची जबाबदारी दिली आहे, ते कंत्राटदार या कामात हयगय करीत असल्याचे दिसते. सध्या प्रखर उन्हाळा सुरू आहे. उन्हामुळे झाडे सुकू लागली आहेत. वृक्षारोपणासाठी लाखोंचा खर्च केला जात असेल तर वृक्ष संवर्धनाकडे लक्ष देण्याची गरज असते. परंतु असे होताना दिसत नाही. त्यामुळे सौंदर्यीकरणाची पार ऐसीतैशी झाली आहे याकडे महापालिकेने गांभीर्याने लक्ष द्यायला हवे, अशी मागणी नागरिकांची आहे.

Web Title: Amuavati on the way to dry seedlings on divisions