All four of them simultaneously burnt with lizards | चिमुकल्यांसह चौघांना एकाचवेळी भडाग्नी
चिमुकल्यांसह चौघांना एकाचवेळी भडाग्नी

ठळक मुद्देग्रामस्थांना अश्रू अनावर : मालखेडात चूल पेटलीच नाही

वरूड : तालुक्यातील मालखेड येथील सोनारे कुटुंबातील चौघांवर गुरुवारी सायंकाळी शोकविव्हळ वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सारा गाव उलटला. गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास सोनारे दाम्पत्य दोन्ही मुलांसह अपघाती दगावल्याची माहिती गावात पोहोचली. सकाळी निघतेवेळी अनेकांना संध्याकाळी येतो, असे सांगून गेलेल्या कुटुंबाचे पार्थिवच घरी पोहोचल्याने गाव हळहळले. एकाही घरातील चूल पेटली नाही.
प्रकाश सोनारे हे आपल्या दुचाकीने पत्नी जयश्री व मुले वैष्णवी व आयुष यांना घेऊन चुलत सासऱ्यांच्या तेरवीकरिता निघाले असता, त्यांना गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास चारचाकी वाहनाने धडक दिली. यात चौघांचाही जागीच मृत्यू झाला. होत्याचे नव्हते झाले. अपघाताची माहिती मिळताच अनेकांनी वरूडच्या ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. ग्रामस्थांनी रुद्रावतार धारण करून पोलीस यंत्रणेला जाब विचारला. पोलीस अन् ग्रामस्थांमध्ये तूतू-मैमै झाली. चौघांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या वाहनचालकास आताच अटक करा, असा आग्रह त्यांनी लावून धरला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर दुपारी ४ वाजताच्या सुमारास चारही मृतदेहांचे शवविच्च्छेदन वरूड ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. दुसरीकडे गावात स्मशानशांतता पसरली. एकाचवेळी चार कलेवर पाहून ते स्मशानभूमीत घेऊन जाताना अनेकांचा अश्रुंचा बांध फुटला. दोन चिमुकल्यांसह पती-पत्नीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. आप्तेष्ट दु:खसागरात बुडाले. वर्धमनेरी येथील तेरवीचा कार्यक्रम सोडून अनेकांनी मालखेड गाठले. सुमारे ५ ते सहा हजार लोक अंत्ययात्रेत सहभागी झाले. प्रत्येकाचे डोळे पाणावले होते.

सोनारे परिवारावर आघात
सायंकाळी परततो, असे सांगून सकाळीच घराबाहेर पडलेले प्रकाश सोनारे, त्यांची पत्नी व दोन मुलांचे पार्थिव पाहून प्रकाश यांचे वृद्ध आई-वडील नि:शब्द झाले. ते शून्यात हरविले. एकाच वेळी मुलगा, सून व नातवांचा मृत्यू त्यांना नि:शब्द करुन गेला. प्रकाशच्या भावांच्या डोळ्यातील अश्रूही थिजले होते.

ग्रामस्थांसह नातेवाईकांचा राग अनावर
चारचाकी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करा, अन्यथा मृतदेह उचलणार नाही, असा पवित्रा घेतल्यामुळे तणाव निर्माण झाला. वरूड पोलिसांसह शेंदूरजनाघाट, बेनोडा येथून पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. ग्रामीण रुग्णलयाला पोलीस छावणीचे स्वरुप आले होते. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेशपंत वडस्कर व पोलिसांनी नातेवार्ईकांची समजूत काढली. अखेर दुपारनंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

Web Title: All four of them simultaneously burnt with lizards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.