५६ गावांना लागले आसेगाव तालुका निर्मितीचे वेध

By Admin | Updated: March 8, 2015 00:16 IST2015-03-08T00:16:07+5:302015-03-08T00:16:07+5:30

अमरावती जिल्ह्यात नियोजित एकूण १७ तालुक्यांमध्ये १५ वा तालुका म्हणून आसेगाव तालुका निर्मितीच्या प्रस्तावाची वार्ता पसरल्यापासून परिसरातील ५६ गावांतील ....

56 villages started to watch the creation of Asgegaon taluka | ५६ गावांना लागले आसेगाव तालुका निर्मितीचे वेध

५६ गावांना लागले आसेगाव तालुका निर्मितीचे वेध

आसेगाव (पूर्णा) : अमरावती जिल्ह्यात नियोजित एकूण १७ तालुक्यांमध्ये १५ वा तालुका म्हणून आसेगाव तालुका निर्मितीच्या प्रस्तावाची वार्ता पसरल्यापासून परिसरातील ५६ गावांतील नागरिकांना आसेगाव तालुका निर्मितीची प्रतीक्षा लागली आहे.
आसेगाव हे अमरावती ते परतवाडा आणि दर्यापूर ते चांदूरबाजार या चार शहरांना जोडणाऱ्या मुख्य मार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असून येथे परिसरातील ३० ते ३५ गावांचा रोजचा संपर्क होतो. आसेगावच्या भोवताल अचलपूर, चांदूरबाजार, भातकुली व दर्यापूर या तालुक्यात अंतर्भूत असलेल्या गावांच्या सीमारेषा आहेत. हाकेच्या अंतरावरील पोहरा या गावासह पूर्णानगर वातोंडा, हिंमतपूर, अंचलवाडी, उमरटेक, वाकी, रायपूर, निरुळगंगामाई, मार्की, रामा आदी गावे भातकुली तालुक्यात समाविष्ट असून भातकुलीचे अंतर लांब असल्याने त्यांना गैरसोयीचे वाटते. तसेच येलकी, सावळापूर, वासनी (बु.), वासनी (खुर्द), हिवरापूर्णा, खैरी, दोनोडा, सावळी, येसूर्णा ही गावे अचलपूर तालुक्याला जोडली आहेत. तर आसेगावसह टाकरखेडा, तळणी, तामसवाडी, विरूळ, चिंचोली, दहिगाव, गोविंदपूर, जगन्नाथपूर, रसुलापूर, कृष्णापूर, धानोरा, राजना, कोटगावंडी आदी गावे चांदूरबाजार तालुक्यात समाविष्ट आहेत आणि आसेगाव ते दर्यापूर रोडवरील सांगवा, घडा या गावापासून पुढे दर्यापूर तालुक्याची हद्द सुरू होते.
प्रस्तावित आसेगाव तालुक्यामध्ये ५६ गावे आणि १० उजाड अशा एकूण ६६ गावांचा समावेश करण्याचा प्रस्ताव शासनाकडे विचाराधीन असल्याचे वृत्त पसरल्यापासून परिसरातील लोकांचे लक्ष आसेगावकडे लागले असून पुढच्या सोयीसाठी काहींनी येथे जागा वगैरे खरेदी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आता फक्त आसेगाव तालुक्याच्या निर्मितीची घोषणा होण्याची प्रतिक्षा आहे. (वार्ताहर)

Web Title: 56 villages started to watch the creation of Asgegaon taluka