शहरात 48 तासांत कोरोनाचे 24 बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 05:00 AM2021-03-01T05:00:00+5:302021-03-01T05:01:02+5:30

महापालिका हद्दीत कोरोनाग्रस्तांची मृत्युसंख्या वाढल्याने हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नेहमीपेक्षा अनेक पटींनी येत आहेत. गॅस दाहिनी सकाळी ८ ते रात्री ११ पर्यंत निरंतर सुरू असल्यामुळे स्मशानभूमी परिसराचे तापमान वाढले आहे. अंत्यसंस्कारासाठी मृतदेहांची संख्या वाढत असल्याने नियोजन करताना दमछाक होत असल्याचे चित्र आहे. १३ ते १७ फेब्रुवारी दरम्यान गॅस दाहिनीत तांत्रिक बिघाड आला होता.

24 victims of corona in 48 hours in the city | शहरात 48 तासांत कोरोनाचे 24 बळी

शहरात 48 तासांत कोरोनाचे 24 बळी

Next
ठळक मुद्दे३७ मृतांचा सरणावर अंत्यविधी, फेब्रुवारी महिन्यात मृत्युसंख्या वाढली

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : हिंदू स्मशानभूमीच्या गॅस दाहिनीत शनिवार, रविवार अशा दोन दिवसांत कोरोनाचे बळी ठरलेल्या २४ मृतदेहांवर गॅस दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले तसेच ३७ मृत व्यक्तींचा सरणावर अंत्यविधी आटोपला. कोरोना संसर्गामुळे फेब्रुवारीत मृत्युसंख्या बळावल्याची माहिती हिंदू स्मशानभूमी संस्थेचे प्रबंधक एकनाथ इंगळे यांनी ‘लोकमत’ला दिली.
महापालिका हद्दीत कोरोनाग्रस्तांची मृत्युसंख्या वाढल्याने हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नेहमीपेक्षा अनेक पटींनी येत आहेत. गॅस दाहिनी सकाळी ८ ते रात्री ११ पर्यंत निरंतर सुरू असल्यामुळे स्मशानभूमी परिसराचे तापमान वाढले आहे. अंत्यसंस्कारासाठी मृतदेहांची संख्या वाढत असल्याने नियोजन करताना दमछाक होत असल्याचे चित्र आहे. १३ ते १७ फेब्रुवारी दरम्यान गॅस दाहिनीत तांत्रिक बिघाड आला होता. या पाच दिवसांत कोरोना संक्रमित मृतदेहांचे अंत्यसंस्कार सरणावर करण्यात आले. त्याकरिता स्वतंत्र ओट्यांची व्यवस्था अध्यक्ष आर. बी. अटल यांच्या मार्गदर्शनात केली होती. शनिवारी ११ मृतदेहांवर गॅस दाहिनीत अंत्यसंस्कार झाले. याशिवाय २६ मृत व्यक्तींना सरणावर, तर एकावर दफनविधी करण्यात आला. रविवारी १३ कोरोना मृतदेहांवर  गॅस दाहिनीत अंत्यसंस्कार पार पडले असून, ११ मृत व्यक्तींचा सरणावर अंत्यविधी आटोपला.
गत दोन दिवसांत सरणावर ३७, तर गॅसदाहिनीवर कोरोनाचे २४ मृतदेहांवर अंतसंस्कार करण्यात आले. कोरोनामुळे मृत्युसंख्या वाढल्याने स्मशानभूमीच्या नियोजनावर ताण येत आहे. गॅसदाहिनीचे नवीन तिसरे युनिट लवकरच साकारले जाणार आहे. त्याकरिता कोटेशन मागविले आहे. हिंदू स्मशानभूमी संस्थेच्या ई-मेलवर कोटेशन प्राप्त झाले आहे. एका गॅसदाहिनीच्या युनिटसाठी ६० लाखांचा खर्च लागतो. युनिट साकारण्यासाठी ऑर्डर दिल्यानंतर दीड महिन्यात काम पूर्णत्वास येते, अशी माहिती आहे. 
गॅस दाहिनीसह अंत्यसंस्कारासाठी नव्याने ओट्यांची निर्मितीसुद्धा प्रस्ताव करण्यात आली आहे. 

आकडेवारीत तफावत
शहरातील एक्झॉन रुग्णालयात शारदानगरातील ८६ वर्षीय पुरुषाचा शुक्रवारी कोरोनाने उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र, ४८ तासांत या व्यक्तीची कोरोनाने दगावलेल्यांच्या यादीत नोंद नसल्याचा आक्षेप नातेवाइकांनी घेतला आहे. कोरोनाने बळीची संख्या वाढत असल्याने मृतांच्या आकडेवारीत तफावत तर होत नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्कार होते. मात्र, कोरोनाने मृताच्या यादीत नाव समाविष्ट केले जात नाही, असा आक्षेप आहे.

कोरोनाग्रस्तांसाठी एकच शववाहिका
कोरोनाग्रस्ताचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास रुग्णालय ते स्मशानभूमी यादरम्यान मृतदेह वाहून नेण्यासाठी एकच शववाहिका आहे. त्यामुळे रुग्णालयात कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतरही दोन ते तीन तासांपर्यंत अंत्यसंस्काराकरिता पाठविण्यासाठी नातेवाइकांना प्रतीक्षा करावी लागते. ही बाब नित्याचीच झाली आहे. या गंभीर बाबीकडे आरोग्य यंत्रणेने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. एकाच शववाहिकेमुळे आरोग्य प्रशासनावरही ताण आहे. 

फेब्रुवारीत मृतांची संख्या वाढली आहे. विशेषत: कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करताना ताण येत आहे. अलीकडे एका शववाहिकेत दोन मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणले जात आहेत. हिंदू स्मशानभूमीकडे असलेली शववाहिका महापालिकेला कोरोनाग्रस्तांचे मृतदेह वाहून आणण्यासाठी दिली आहे. सकाळी ८ ते रात्री ११ या वेळेत गॅसदाहिनी त्यांच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया सुरू असते. सध्या गॅस दाहिनीचे दोन युनिट कार्यरत आहेत. 
आर.बी. अटल, अध्यक्ष, हिंदू स्मशान संस्था, अमरावती
 

Web Title: 24 victims of corona in 48 hours in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.