परिश्रमातून गाठले प्रशिकने यशोशिखर

By Admin | Updated: June 25, 2014 02:40 IST2014-06-25T02:38:28+5:302014-06-25T02:40:12+5:30

ग्रामीण भागातील युवक बनला फॅशन डिझायनर

Yashohishikhar's achievement from labor | परिश्रमातून गाठले प्रशिकने यशोशिखर

परिश्रमातून गाठले प्रशिकने यशोशिखर

अकोला : यशाचे शिखर गाठायचे असेल तर त्यासाठी परिश्रम हे एकमात्र साधन आहे. यशाच्या आड जात, धर्म, गाव अथवा शिक्षण येत नाही, हेच सिद्ध केले आहे अकोला जिल्ह्यातील पातूर या ग्रामीण भागातील प्रशिक खंडारे या युवकाने. गाव-खेड्यात राहून मराठीत शिक्षण घेणार्‍या प्रशिकने आपल्या मेहनतीच्या बळावर फॅशन डिझायनर म्हणून नावलौकिक प्राप्त केला आहे.
पातूर येथील नगर परिषदेच्या प्राथमिक शाळेत प्रशिकने आपल्या शिक्षणाचा श्रीगणेशा केला. पुढे अकोल्यातील भारत विद्यालयात माध्यमिक शिक्षण व उच्च माध्यमिक शिक्षण पातूर येथील तुळसाबाई कावल विद्यालयात पूर्ण करून प्रशिक पाटणा येथे फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेला. राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एनआयएफटी) पाटणा, बिहार येथे प्रशिकने प्रवेश घेतला. येथे बॅचलर ऑफ डिझाईन (बी.डीईस) ही भारत सरकारच्या वस्त्र मंत्रालयातर्फे पदवी त्याने प्रावीण्य श्रेणीत प्राप्त केली.
याच काळात प्रशिकने अनेक पुरस्कारदेखील पटकावले. यात बेस्ट डिझायनर-२0१४, फेमिना मिस इंडिया-२0१४ स्पर्धेत कास्च्युम डिझाईन स्पर्धेत द्वितीय पुरस्कार, एक्सलंट अवॉर्ड-२0१३, आर्टिस्टिक-आयआयटी पाटणा व बिडको यांच्यावतीने आयोजित स्पर्धेत प्रथम पुरस्कार, बेस्ट डिझायनर फॅशन-२0१३ आदी पुरस्कारांचा समावेश आहे.
सध्या प्रशिक कॅलिफोर्निया येथील बॉलीवुड डान्स अकादमीसाठी कास्च्युम डिझायनर म्हणून काम करीत आहे. गुजरात येथील ह्यशामल आणि भूमिकाह्ण या कंपनीत प्रशिक डिझायनर म्हणून काम करीत आहे. प्रशिकला त्याचे शिक्षक असलेले वडील सुखनंदन खंडारे, आई पुष्पलता खंडारे, भाऊ मिलिंद खंडारे, बहीण विद्या इंगळे, जावई अमर इंगळे व मामा संजय क्षीरसागर यांचे मार्गदर्शन लाभले. ग्रामीण भागातून येऊन प्रशिकने जे यश मिळविले, ते युवकांसाठी निश्‍चितच दिशादर्शक ठरणारे आहे.

Web Title: Yashohishikhar's achievement from labor