पक्षविरोधी कारवाया करणा-यांना कार्यकर्त्यांना घरचा रस्ता

By Admin | Updated: February 18, 2017 02:34 IST2017-02-18T02:34:31+5:302017-02-18T02:34:31+5:30

पक्षश्रेष्ठींनी मागितले स्थानिक पदाधिका-यांना अहवाल

Workers' home road to anti-party workers | पक्षविरोधी कारवाया करणा-यांना कार्यकर्त्यांना घरचा रस्ता

पक्षविरोधी कारवाया करणा-यांना कार्यकर्त्यांना घरचा रस्ता

अकोला, दि. १७-महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाने उभ्या केलेल्या उमेदवारांच्या विरोधात पडद्याआडून कारवाया करणार्‍या पदाधिकार्‍यांना घरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय प्रमुख राजकीय पक्षांनी घेतला आहे. यासंदर्भात पक्षश्रेष्ठींनी स्थानिक पदाधिकार्‍यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे.
राजकीय पक्ष कोणताही असो त्यामध्ये समाजात प्रतिष्ठा मिळेल या उद्देशातून पदे घेऊन मिरवणार्‍यांची मोठी संख्या राहते. पाठीमागे कवडीचाही जनाधार नसताना केवळ वरिष्ठ नेत्यांचे आवभगत करणे, त्यांची बडदास्त राखणार्‍यांचे पेव फुटले आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी बोलताना मात्र पक्षात मोठे वजन असल्याचे भासवून दुकानदारी करणार्‍यांचे पितळ यंदा महापालिकेच्या निवडणुकीत उघडे पडले आहे. जाती-पातीच्या समीकरणांवर तिकिटासाठी पक्षाची मनधरणी करणार्‍या अशा पदाधिकारी-कार्यकर्त्यांना सर्वच पक्षांनी नाकारल्याचे चित्र आहे. असे पदाधिकारी-कार्यकर्ते पक्ष विरोधी कारवायांमध्ये गुंतले आहेत. पक्षाने निवडणूक रिंगणात उभ्या केलेल्या उमेदवाराचे काम न करता प्रतिस्पर्धी पक्षातील उमेदवारांच्या प्रचाराची आखणी करणे, मतांची जुळवाजुळव करण्याचे काम संबंधित पदाधिकार्‍यांनी सुरू केल्याची बाब प्रमुख राजकीय पक्षांच्या निदर्शनास आली आहे. पडद्याआडून पक्षविरोधी कारवायात गुंतलेल्या अशा पदाधिकार्‍यांचा अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित राजकीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्याची माहिती आहे.

निकालानंतर ठरणार भवितव्य
महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाचे किती उमेदवार निवडून येतात, यावर संबंधित पदाधिकार्‍यांचे भवितव्य अवलंबून आहे. पक्षाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्यास संबंधितांची गच्छंती निश्‍चित मानली जात आहे.

Web Title: Workers' home road to anti-party workers